Home यवतमाळ घरकुलाची रक्कम साडेतीन लाखापर्यंत वाढवून मिळावी

घरकुलाची रक्कम साडेतीन लाखापर्यंत वाढवून मिळावी

62

ट्रायबल फोरमचे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना निवेदन

प्रतिनिधी पांढरकवडा

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या घरकुलाची रक्कम ही सद्यस्थिती पाहता फारच कमी आहे. ही घरकुलाची रक्कम तीन लाख पन्नास हजार रुपये इतकी वाढवून द्यावी अशी मागणी यवतमाळ जिल्हा ट्रायबल फोरमचे जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ई मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

सर्वसामान्य गोरगरीब जनतेला स्वतःच्या हक्काच्या घरात राहता यावे याकरिता भारत सरकारकडून पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना व इतर घरकुल योजना राबविण्यात येतात.

सध्यस्थितीत पंतप्रधान आवास योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. मात्र या योजनेसाठी शासनाकडून मिळणा-या निधीची रक्कम अत्यंत कमी आहे.

महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे.प्रत्येक वस्तूचे व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामध्ये घर बांधकामासाठी लागणारे सिमेंट, विटा, वाळू, लोखंड, गज, मजुरी तसेच मिस्त्रीची मजुरी इत्यादींचे भाव प्रचंड वाढले आहेत. या प्रचंड वाढत्या महागाईमुळे तो लाभार्थी आपले घर शासनाच्या अल्पशा कमी अनुदानात बांधू शकत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील अनुदान समसमान देण्यात यावे.

बाँक्स
*असे आहे घरकुल अनुदान*
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील घरकुलाला ग्रामपंचायत स्तरावर १ लाख २० हजार रुपये अनुदान आहे तर शहरी भागातील नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना २ लाख ५० हजार रुपये आहे. या रक्कमेमध्ये वाढती महागाई लक्षात घेता कुठल्याही प्रकारे घराचे बांधकाम पूर्ण होत नाही.

कोट
भारत सरकारने सन २०१५ पासून योजना सुरु केली आहे.सात वर्षात बांधकाम वस्तू व साहित्यांच्या किंमती प्रचंड वाढल्या परंतू अनुदानात मात्र वाढ करण्यात आली नाही. गरीबांच्या घरकुलाचे अल्पशा अनुदानात बांधकाम होत नाही.त्यामुळे अनुदानात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
– अंकित नैताम जिल्हा उपाध्यक्ष ट्रायबल फोरम यवतमाळ.