फुलचंद भगत
वाशिम:-समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे वारंवार अवैध धंद्यांविरोधात कारवाई सत्र राबविले जाते. त्यामध्ये अवैध धंदे करून समाजाची शांतता बिघडवू पाहणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करत कायद्याचा वचक निर्माण केला जातो.
त्यापार्श्वभूमीवर दि.२९.०३.२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या वाशिम पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्था.गु.शा.वाशिम पथकाने ग्राम रिठद शेतशिवारातील जुगाराच्या अड्डयावर छापा टाकला असता पोलिसांना पाहून जुगार खेळणारे पळून गेले मात्र घटनास्थळावर असलेल्या ०८ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यावेळी १२ जणांविरुद्ध जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली असून जुगार साहित्यासह २.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर दि.२८.०३.२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम कारंजा पथक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पो.स्टे.मानोरा हद्दीतील ग्राम फुलउमरी, ता.मानोरा, जि.वाशिम येथे छापा टाकून अवैधपणे देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या आरोपीवर कारवाई करत ५१८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेल्या १५ दिवसांच्या कालावधीत वाशिम पोलीस घटकातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ६० ठिकाणी जुगार अड्ड्यांवर पोलीसांनि छापा टाकत ८२ जणांवर जुगार प्रतिबंधक कारवाई केली असून एकूण ४.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर अवैधपणे गावठी दारू विक्री करणाऱ्या ४९ जणांवर ३८ प्रकरणांमध्ये कारवाई करत २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली गेल्या १५ दिवसांमध्ये ९८ प्रकरणांमध्ये तब्बल १३१ आरोपींवर जुगार व दारू प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेदेखील सदर कारवाईचे धाडसत्र सुरु राहणार आहे.कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल दक्ष असून नागरिकांनी अवैध धंद्याबाबतची माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अंमलदार यांना द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.