Home यवतमाळ कापेश्वर येथे निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीची 8 एप्रिल रोजी जाहीर...

कापेश्वर येथे निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीची 8 एप्रिल रोजी जाहीर सभा..,!

168

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन….!

(अयनुद्दीन सोलंकी)
————————
घाटंजी :- घाटंजी तालुक्यातील ताडसावळी येथे होणारया निम्न पैनगंगा प्रकल्पासंदर्भात मौजा कोपेश्वर येथे 8 एप्रिल रोजी विदर्भ – मराठवाड्यातील बहुचर्चित निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भ व मराठवाड्याच्या 95 गावांवर नांगर फिरवून शेतकरी, शेतमजुरांना विस्थापित करणाऱ्या निम्न पैनगंगा धरणाला विरोध करण्यासाठी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. 8 एप्रिल शनिवार रोजी दुपारी 12 वाजता विदर्भ व मराठवाड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कापेश्वर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आले आहे. या सभेतून निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निम्न पैनगंगा प्रकल्प चर्चेत आले आहे.

95 गावांवर नांगर फिरवून एक लाख जनतेला विस्थापित करणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्पाला गेल्या 25 वर्षांपासून विरोध होता व तोच विरोध आजही कायम आहे. आता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाची आग्रही भूमिका असल्याने बुडीत क्षेत्रातील विस्थापित होऊ पाहणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांनी तीव्र विरोध सुरू केला आहे.

बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार बंद झाल्याचे शासनाचे पत्र निघताच प्रथम सावळी (सदोबा) येथे 10 नोव्हेंबर 2022 रोजी सहविचार सभा घेऊन धरण विरोधी संघर्ष समितीने सर्व शेतकरी, शेतमजुरांना सोबत घेऊन या धरणाच्या विरोधात कंबर कसली आहे. या धरणात विकसित झालेली 95 गांवे तथा एक‌ लाख लोकं, जवळपास 20 हजार हेक्टर सुपिक शेतजमीन व एक‌ हजार हेक्टर समृद्ध जंगल बुडीत क्षेत्रात जाणार आहे. जाहीर सभेत बुडीत क्षेत्रातील लोकांच्या मनातील अनेक प्रश्नांचे निरसन केल्या जाईल. नविन स्विकारण्या योग्य सूचना असल्यास त्या स्वीकारण्यात येईल. आंदोलनाचे ध्येय – धोरण विशद करून अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

या सभेला जेष्ठ पत्रकार तथा प्रसिद्ध लेखक पद्माकर मलकापुरे यवतमाळ, विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांची कन्या तथा विदर्भ अन्याय निवारण समिती अध्यक्षा ॲड.  क्रांतीताई धोटे (राऊत), सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता भास्करराव पंडागळे यांची उपस्थिती असणार असुन मोलाचे मार्गदर्शन करणार आहे. तेव्हा  बुडीत क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी मंडळी, महिला, पुरुष, युवक, युवतींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक सचिव मुबारक तंवर यांनी केले आहे.