Home बुलडाणा शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणात सुधारणा करा- अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणात सुधारणा करा- अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना

67

प्रतिनिधी :-रवी अण्णा जाधव

देऊळगाव मही – शासनाने ग्रामविकास विभागाच्या दि.०७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसाठी जिल्हांतर्गत बदली धोरण निश्चित केले होते व यानुसार २०२१-२२ च्या बदल्याही करण्यात आल्या मात्र यात काही सुधारणा करण्याची शिक्षकांची मागणी लक्षात घेता शासनाने पुन्हा एक अभ्यासगट तयार केले आहे. या जिल्हांतर्गत बदली धोरणात विविध सुधारणा करण्यासाठी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेने मा.जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या मार्फत मा.ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
बदलीपात्र होण्यासाठी ३१ मे ऐवजी ३० जून पर्यंतची सेवा गृहीत धरावी व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या सामान्यपणे वर्षातून एकदाच दिनांक १ मे ते ३० जून पर्यंत करण्यात याव्या. शाळा सुरू होई पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण होत नसल्यास त्या वर्षाच्या बदल्या रद्द कराव्यात व पुढील शैक्षणिक वर्षाच्या ३० जून च्या तारखेनुसार सेवा व इतर बाबी धरून पुढील वर्षी १ मे ते ३० जून पर्यंत शाळा सुरू होण्याअगोदर काटेकोरपणे बदल्या कराव्यात. कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरू असतांना शिक्षकांना बदली अर्ज भरण्याची गरज पडू नये कारण यामुळे शिक्षकांच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होण्याची व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याव्यतिरिक्त नवीन नियुक्त तसेच आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांवर अन्याय होऊ नये म्हणून बदलीपात्र होण्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे ऐवजी ५ वर्षे करावी. ऑनलाईन बदली प्रणालीत प्राथमिक प्रमाणे जिल्हापरिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचाही समावेश करण्यात यावा. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्र किंवा रिक्त पदे जास्त असलेल्या तालुक्यात पाठविण्याची सक्ती न करता समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे त्यांच्या समुपदेशनासाठी खुली करण्यात यावी. जुन्या 27 फेब्रुवारी 2017 च्या धोरणानुसार एकाच टप्प्यात व कमी वेळेत सहजपणे बदली प्रक्रिया पूर्ण व्हावी असे धोरण निश्चित करावे. अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. संघटनेच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष सय्यद अनीस, राज्यसचिव शेख जमीर रजा, राज्य उपाध्यक्ष जाफर पटेल सरकार, विभागीय सहसचिव रियाज अहमद सह हुसैन कुरेशी, शेख मोबीन, शाहिद हुसैन, शेख नूरुद्दीन, सय्यद रिजवान, वसीम असद आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.