Home पालघर सामाजिक कार्यकर्ते ॲड.पारस सहाणे यांना पालघर जिल्हा युवा पुरस्कार जाहिर

सामाजिक कार्यकर्ते ॲड.पारस सहाणे यांना पालघर जिल्हा युवा पुरस्कार जाहिर

63
जिल्हा क्रीडा विभागाने केली घोषणा ; जव्हार शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा
*जव्हार* :-सोमनाथ टोकरे
जव्हार येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड.पारस सहाणे यांना सन २०२३ चा पालघर जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पालघर जिल्हा क्रीडा विभागाने नुकतीच त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
१ मे महाराष्ट्र दिनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पालघर जिल्हा मुख्यालय येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध विषयात युवांनी पार पाडलेल्या भुमिका, दिलेले योगदान व त्यामुळे जिल्ह्यातील युवांनी केलेले समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर राज्याचे क्रीडा धोरण २०१२ अंतर्गत युवा पुरस्कार देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेले, निसर्गसंपन्न जव्हार या जव्हार नगरीवर जशी निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे तशीच आदिवासी बांधवांची सांस्कॄतिक राजधानी म्हणून जव्हारची ओळख आहे…
संस्थानिक पार्श्वभूमी व वैचारिक बैठक लाभलेल्या या जव्हार नगरीत अनेक रत्ने जन्माला आली व त्यांनी नावलौकिक प्राप्त केला गांव माझा..मी गावाचा… या उक्तीप्रमाणे जव्हारीत अनेकांनी शहराच्या व आदिवासी भागाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे.
खरे तर… महाराष्ट्रातील एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून दर्जा मिळालेल्या जव्हार तालुक्याला कुपोषणामुळे कलंक लागलेला आहे. तालुक्याच्या विकासासाठी व आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचाविण्यासाठी अहोरात्र झटणा-या शहरातील एका युवकाला पालघर जिल्हा युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याने जव्हार शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे….
उच्च शिक्षण घेऊन सुद्धा बाहेरगावी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून जव्हार गावाचे विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याने जव्हार गावातच राहून जव्हार गावाचा पर्यटन विकास करण्यास वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षांपासून सुरुवात केली.
जव्हार पर्यटन स्थळाला सुगीचे दिवस आलेत त्यात त्यांचे बहुमोल असे योगदान आहे. जव्हार पर्यटन स्थळांचा विकासाबाबतीत पारस सहाणे यांचे नाव अग्रक्रमी आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून जिल्हातील आरोग्य, शिक्षण, रोजगार व पर्यटन इ. विषयावर सातत्याने प्रकाश टाकून शासन दरबारी आदिवासी बांधवांचा आवाज बुलंद करित आले आहेत…. समाजसेवेच्या माध्यमातून तालुक्याची शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत
ग्रामीण आदिवासी तालुक्यातील आरोग्य सुविधांच्या सुधारणेसाठी श्री. सहाणे यांचा शासनाकडे सातत्याने आग्रह आहे. जव्हारच्या पर्यटन वाढीसाठी श्री. पारस सहाणे यांनी अनेक नवनविन कल्पना मांडल्या आहेत.
पारस सहाणे हे स्वतः वकील असुन आपल्या ज्ञानाच्या उपयोग आपल्या आदिवासी भागाचा कायापालट करण्यासाठी व्हावा त्यासाठी ते सदैव प्रयत्नशील आहेत.
सहाणे यांना युवा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
———
सामाजिक कार्यकर्ते पारस सहाणे यांचं कार्य मी खूप वर्षापासून पाहत आहे, आपल्या देशासाठी ,आपल्या भूमीसाठी कुठली अपेक्षा न करता त्यांचे कार्य सुरू असते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मी त्यांचा अभिनंदन करतो.
-प्रकाश निकम
अध्यक्ष -जिल्हा परिषद,पालघर