मुंबई : (रवींद्र मालुसरे)
३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून, मिरॅकल फाउंडेशन (मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र) येथे डॉक्टर अश्विन घुमाडे यांच्या उपस्थितीत, केंद्रात दाखल असलेल्या व्यक्तींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी डॉक्टर घुमाडे म्हणाले की, लहान वयातील मुलांमध्ये गुटखा, सिगारेट यांच्या आकर्षणाचे प्रमाण वाढत आहे. ही फार चिंतेची बाब आहे. कारण अशी व्यसने जर टाळली नाही तर, पुढे जाऊन हृदयरोग, कर्करोग, फुफुसाचा आजार, यकृताचा आजार, टीबी या सारख्या भयानक आजाराला सामोरे जावे लागते. या ऐवजी मुलांनी व्यायाम, प्राणायाम, योगासने करणे जास्त योग्य आहे.
यावेळी केंद्रप्रमुख किशोर किणी म्हणाले की, व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्यानंतर, तंबाखू किंवा विडी मागणाऱ्या व्यक्तीलाच दिवसाला एक चिमूट चार वेळा अथवा चार विड्या दिल्या जातात. याचे कारण असे की, कोणत्याही व्यसनांची सुरुवात तंबाखू, सिगारेट, गुटखा, मावा याच्यातूनच होते. केंद्रात दाखल केल्यानंतर सगळी व्यसने अचानकपणे बंद झाल्यावर, या व्यक्तींमध्ये चिडचिडपणा, रागवणे, अस्वस्थ राहणे, मानसिक संतुलन बिघडणे असे प्रकार समोर येतात. पण केंद्रप्रमुख म्हणून मला कुठेतरी असे जाणवत होते की, जर व्यसनाधीन व्यक्ती व्यसने सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होत असतील. तर मग तंबाखू, विडी तरी का द्यायची. सुरुवातीला काही दिवस त्यांना त्रास होईल. त्यावर औषध उपचार करता येईल. याबाबत मी आमच्या व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष (बाबूजी) मनराय यांच्याशी चर्चा केली. मग केंद्रात दाखल असलेल्या व्यक्तींना मी सांगितले की, सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने व्यसनमुक्ती केंद्रात तंबाखू, विडी असे पदार्थ देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शनिवार दिनांक १८ मार्च २०२३ पासून केंद्रामध्ये पंधरा-पंधरा दिवसांच्या क्रमाने तंबाखू, विडी देण्याचे प्रमाण चार, तीन, दोन, एक अशावर आणले. त्यानंतर तंबाखू, विडी देणे बंद केले. मला विशेष सांगायला आवडेल की, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
या संस्थेचे अध्यक्ष बाबूजी व आमच्या संस्थेचे समन्वयक आणि कार्यक्रम आयोजक रमेश सांगळे यांच्याशी बैठक करून आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.