जव्हार:-सोमनाथ टोकरे
जव्हार,दि ३० ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हारला प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे शहराची प्रगती खुंटली असल्याचे चित्र आहे. सामान्य जनतेला पायाभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. जानेवारीमध्ये जव्हार नगर परिषदेची कार्यकारणी बरखास्त होऊन प्रशासक राजवट लागू झाली. त्या दृष्टीने शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात हे केंद्रस्थानी असताना, मुख्याधिकारी तथा प्रशासक या वेळेत उपस्थित राहत नसल्याची अनेक दिवसांपासून नागरिकांची तक्रार आहे.नागरिकांची अनेक कामे त्यामुळे खोळंबत आहेत, त्यामुळेच पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र उघड्या डोळ्यांनी पाहावयास मिळत आहे. याच समस्यांचे उच्चाटन व्हावे यासाठी शहरातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून शेकडोंच्या संख्येने नगरपरिषद कार्यालयात मंगळवारी दि.३० मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजेपासून आक्रोश आंदोलन सुरु करण्यात आले. आंदोलनाचाच ऐक भाग म्हणून भजन आंदोलन करण्यात आले.
नगरपरिषद प्रशासनाच्या माध्यमातून शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक समस्या असताना, त्याकडे दुर्लक्ष करून प्रशासन केवळ लाभाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या हे निदर्शनास आल्यानंतर तालुकाप्रमुख श्रावण खरपडे यांच्या नेतृत्वात भजन आंदोलन करण्यात आले.व ऐक निवेदन देण्यात आले. यामध्ये खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या, १) शहरातील खडखड धरणाची पाईप लाईन सद्यस्थिती सुधारून वेळेत काम व्हावे, शासकीय कार्यालया करिता जिओ कनेक्शन साठी खोदण्यात आलेले शहरातील रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करून घ्यावे.२) जव्हार शहरातील नाले व गटारी यांची साफसफाई पावसाळ्या पूर्वी करून द्यावी ३) जव्हार शहरातील खडखड पाणी पुरवठयाची तातडीने अमंलबजावणी करून दोषी ठेकेदारावर फोजदारी गुन्हा दाखल करावा.४) गेल्या आठ वर्षांपासून पडुन असलेले नगरपरिषदे मार्फत बांधण्यात आलेले गाळे, उदा. पतंगशहा कुटीर रुग्णालय, बस डेपो रोड, मांगेलवाडा रोड येथे सर्व्हे करून लाभार्थ्यांना तातडीने वाटप करावे.५) जव्हार शहरातील साफसफाई नियमित वेळेत रोजच्या रोज करण्यात यावी.
६)गांधी चौक येथील मुतारीची तातडीने दुरुस्ती करून मुतारी जवळील कचरा कुंडीची उंची वाढवून मुतारी समोरील सर्व दुचाकी हटवून सदर मुतारी समोरील रस्ता मोकळा करून घ्यावा, आदी मागण्या ह्या आंदोलनकर्त्यांनी केल्या .या वेळी तालुका प्रमुख श्रावण खरपडे, विक्रमगड विधानसभा समन्वयक विजय अंभिरे,शहर प्रमुख परेश पटेल, उपतालुकाप्रमुख इरफान शेख, अरशद कोतवाल,उप शहर प्रमुख साईनाथ नवले,तसेच नरेश महाले, प्रकाश चुंभळे , अझर फरास तसेच शिवसैनिक महिला आघाडी,युवा सैनिक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
कोट
जव्हार शहरातील नगर परिषद क्षेत्रात समस्यांबाबत आंदोलन कर्त्यानी मांडलेले प्रश्न वेळेत निकाली काढण्यात येणार असून मान्सून पूर्व कामे बाबत संबंधित विभाग प्रमुखाला सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील नागरिकांना उत्तम प्रकारे पायाभूत सुविधा देण्याचे. नगरपरिषद प्रशासनाकडून नियोजन करण्यात येईल.
–मानिनी कांबळे प्रशासक तथा मुख्याधिकारी,
जव्हार ,नगरपरिषद
नागरिकांना पायाभूत सुविधा मिळण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येते, हे प्रशासनाचे सपशेल अपयश आहे. रस्ते, पाणी यासारख्या सोयी सुविधा मिळणे हा शहरातील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे परंतु या घटनात्मक बाबीचा नगरपरिषद प्रशासनाला विसर पडला आहे. श्रावण खरपडे, तालुका प्रमुख,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट