➡️ आर्णी – केळापूरचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांची पत्रकार परिषदेत माहिती..!
( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी – राष्ट्रीय भाजपा व्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या राजवटीला 9 वर्षे पुर्ण झाल्यामुळे संपुर्ण देशभरात मोदी@9 महाजनसंपर्क अभियान राबविण्यास येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आर्णी – केळापुर विधानसभा मतदारसंघात मोदी@9 महाजनसंपर्क अभियानाची घाटंजीतून सुरुवात करण्यात आल्याची माहिती, आमदार डॉ. संदीप धुर्वे (मोदी @9 महाजनसंपर्क अभियान संयोजक) यांनी दिली. ते घाटंजी येथील विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आर्णी – केळापूर विधानसभेचे प्रभारी तथा यवतमाळ जिल्हा भाजपाचे सरचिटणीस रवी बेलुरकर, घाटंजी तालुका भाजपाचे अध्यक्ष सुरेश डहाके, घाटंजी भाजपा शहर अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाळू उर्फ राम खांडरे, भाजपा यवतमाळ जिल्हा शोसल मिडीया प्रमुख अभिजित झाडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस दिलीप पवार, भाजपा युवा मोर्चाचे घाटंजी तालुका अध्यक्ष चेतन जाधव आदीं भाजपाचे अनेक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
30 मे ते 30 जुन पर्यंत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या राष्ट्राच्या उत्कर्षातील देशाच्या विकासातील व सर्व समाज घटकातील लोकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व अन्य क्षेत्रातील योगदान व उपलब्धी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उज्ज्वल करण्याची प्रधानमंत्र्यांची भुमिका या साऱ्या बाबी जनतेसमोर विशेषतः आर्णी – केळापुर मतदार संघात प्रत्येक कार्यकर्ते, घरा – घरापर्यंत पोहचविण्यासाठी हे जनसंपर्क अभियान राबविले जात आहे, अशी माहिती आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी दिली.
मागील 9 वर्षात मोदींनी जनसेवेचे व्रत स्वीकारुन देशाला सुशासन दिले आहे. शेकडो योजनांच्या माध्यमातून गरीब कष्टकऱ्यांचे कल्याण करण्यात सरकारला यश मिळाले आहे. देशात 3.5 करोड पेक्षा अधिक कुटूंबियांना पक्के घर, ग्रामीण भागात 11.72 करोड़ शौचालयाची निर्मिती करुन उच्चांक प्रस्थापित केला आहे. 2023 पर्यंत ग्रामीण भागात शौचालयाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याची हमी, 12 करोड लोकांच्या घरामध्ये नळाच्या पाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे लोकांचा वेळ व कष्ट वाचले, दुषित पाण्यामुळे रोगराई आटोक्यात आणण्याचे काम या माध्यमातून झाले. ग्रामीण क्षेत्रातील गरजू जनतेला सरकारने मोफत गॅस कनेक्शन योजनेतून 9.6 करोड कुटुंबियांना गॅस कनेक्शन उपलब्ध करुन दिले. कोविड -19 संकट काळामध्ये या देशातील गोरगरीब, कष्टकरी जनता उपासी झोपणार नाही याची काळजी घेत 80 करोड पेक्षा अधिक नागरिकांना (प्रति व्यक्ती) अन्न धान्य उपलब्ध करुन दिले. ही संख्या युरोपच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आजवर कधीही मिळाली नाही अशी आरोग्यसेवा दिली आहे. जगाच्या पाठीवर अशी कोणतीही आरोग्याकरिता योजना नाही. या योजनेव्दारे 5 लाखापर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सोय करण्यात आल्याने या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात नागरिकांना झाला व भविष्यात होणार आहे.
रासायनिक खते – मोदीजींच्या 9 वर्षाच्या राजवटीत युरीया व अन्य खतांच्या किंमती स्थिर करण्यात आल्या आहे. यात केंद्र सरकारने कोणतीही वाढ केलेली नाही. खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करीत शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध करण्यास सरकार कटीबद्ध राहीले आहे. जागतिक स्तरावरील पहिल्या सुक्ष्म द्रव युरीया प्रकल्पाची उभारणी केंद्र सरकारने केली आहे. आर्थिक दुर्बलांना उच्च शिक्षनासाठी केंद्र सरकारने आर्थिक गरजांवर आधारित आरक्षण देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या धोरणानुसार आर्थिक दुर्बल (ई.डब्लू.एस) घटकांकरिता 10 टक्के आरक्षण लागू करुन त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीमध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला आहे.
सामाजिक सक्षमीकरणाचे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवून मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा बहाल केला असल्याने मागासवर्गीय बांधवासाठी तो मैलाचा दगड ठरला आहे. त्यांचप्रमाणे देशातील दिव्यांगांची होणारी सामाजिक उपेक्षा, चिंतनीय असल्याने या प्रवर्गात वाढ करित ते 7 वरुन 21 पर्यंत वाढविले आहे.
देशात सन 2014 पर्यंत एकूण 74 विमानतळ कार्यान्वित होते मागील 9 वर्षात देशात 74 नवीन विमानतळांची उभारणी करण्यात आली. यामुळे देशाच्या व्यापार, उद्योगात मोठ्या प्रमाणात भर पडली. त्यामुळे देशाच्या प्रगतीला नवी दिशा लाभली असून प्रगतीचा हा वेग उत्तरोत्तर वाढीस लागणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दुरदृष्टी व नितीन गडकरी यांची अफाट कार्यक्षमतेच्या बळावर राष्ट्रीय महामागांत गेल्या 9 वर्षात वृध्दी होवूने 53.868 कि.मी. लांबीचे नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाले. सन 2014 पर्यंत देशात जलमार्गाव्दारे प्रगतीची दारे शोधण्याचा प्रयत्न कधीच न झाल्याने जलमार्गाची निर्मिती शुन्यावर होती. अवघ्या 9 वर्षात 111 नव्या जलमार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीयांच्या स्वप्नातील जागतिक दर्जाची अत्याधुनिक रेल्वे सेवा वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. सदर एक्सप्रेस देशातील अनेक शहरांमध्ये सुरु झाली असून त्याचा लाभ सर्वसामान्य प्रवासी मोठ्या प्रमाणात घेत आहेत. देशात एम्स संस्थाची संख्या 7 होती ती आता 15 वर पोहचली. वैद्यकीय महाविद्यालये मध्ये 641 होती ती 700 वर पोहचली. पूर्वीच्या 82,466 वैद्यकीय जागांमध्ये वृध्दी होवून 69,663 अधिक जागांमध्ये भर पडली आहे.
देशातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे सरकारचे धोरण असल्याने त्यांनी गेल्या 9 वर्षात आयआयटी, आयआयएम व विद्यापीठाचे जाळे पसरविले आहे. 2014 पर्यंत देशात 16 आयआयटी संस्थान होते त्यात भर टाकत नवी 7 संस्थान उभारले. आयआयएम संस्थान 13 वरुन 20 झाल्या तर देशात 723 विद्यापीठे होती आता त्यात 309 नव्या विद्यापीठांची उभारणी करण्यात आली आहे. देशातील उदात्त संस्कृतीचे जतन, संवर्धन करण्याचे महान कार्य या सरकारने केले आहे. देशातील जनतेचे श्रध्दास्थान असणारे मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामाचे भव्य मंदीर उभारण्याचे स्वप्न मोदीजीव्या राजवटीत पुर्ण होत आहे. हा या देशातील जनतेच्या भावनांचा व धार्मिक परंपरांचा मोठा सन्मान आहे. ईशान्य भारताला जोडण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी धोरणाव्दारे नव्या विस्तार योजना, नवे महामार्ग, नवे एअरपोर्ट व नव्या पुलांची निर्मिती केली आहे. तसेच पुर्वोत्तर भारताच्या (अरुणाचल प्रदेश, आसाम, मनिपुर, मेघालया मिझोरम, नागालैंड, त्रिपुरा, सिक्कीम) संस्कृतीच्या प्रचार व प्रसारासाठी मोदी सरकारचे बहुमूल्य योगदान आहे. या राज्यांना विकास प्रवाहासी जोडत राष्ट्रीय प्रवाहातही सामावून घेतले आहे.
राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च स्थान दिले आहे. पाकिस्तानी आतंकवाद निपटून काढण्यासाठी सरकारने सर्जिकल स्ट्राईक, हवाई हल्ले करीत राष्ट्रविरोधी शक्तींवर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त केले आहे. एक भारत एक संविधान है तत्व स्विकारत कलम 370 व 35A रद्द केले. संरक्षण उत्पादन खर्च 1 लाख कोटीहून अधिक करीत अत्याधुनिक शस्त्रांसह संरक्षण दल सक्षम करीत सीमारस्ते व पुलाचे विक्रमी बांधकाम कैले. देशाला सुरक्षेच्या बाबतीत स्वयंपुर्णता मिळवून दिली आहे. भारतीयांना संकटातून सुरक्षितता प्रदान- प्रधानमंत्री मोदीजींच्या राजवटीत विदेशातील भारतीय नागरिकांना सर्वोच्च सुरक्षा देत मायदेशी आणण्यात मोठे योगदान आहे. युकेन, सिरीया, लिबिया, येमेन, सुदान, नेपाळ, अफगाणिस्तानात संकटात सापडलेल्या 20 हजाराहून अधिक भारतीयांना सुरक्षित आणले तसेच कोविड महामारीच्या काळात 2.97 कोटी भारतीयांना जगभरातून मायदेशी आणत सरकारने मोठी कामगिरी पार पाडली आहे.
त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावरील असामान्य नेतृत्व आहेत. त्यांच्या कार्याची स्तुती जागतिक स्तरावर होत आहे. ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्र्यांनी ‘पीएम मोदी इज द बॉस’ व इटलीच्या प्रधानमंत्र्यांनी ‘पंतप्रधान मोदी हे जगातील सर्व नेत्यांमध्ये सर्वाधिक प्रिय आहेत’ असे विधान करुन मोदीजींच्या जागतिक नेतृत्वाला मान्यता दिली आहे. त्यामुळे जगाचा भारतावर विश्वास आहे आणि भारताचा मोदीवर विश्वास आहे. विश्वास हाच विकासाचा पाया आहे अशी आमची भावना आहे.
9 वर्षात प्रधानमंत्री मोदी यांनी सर्व क्षेत्रात देशाच्या सर्वांगिण विकासात अभुतपूर्व योगदान दिले असल्याने त्यांचे हे योगदान व विकासपर्व देशातील जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी तमाम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची असून मोदी @9 महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आण-केळापुर क्षेत्रातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कटिबध्द असून आपल्या माध्यमातून राष्ट्रविकासाचा हा झंझावात लोकांपर्यंत पोहचावा या उद्देशाने आजच्या या पत्र परिषदेचे आयोजन केल्याचे आमदार डॉ. संदीप धुर्वे (मोदी @9 महाजनसंपर्क अभियान संयोजक) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आर्णी – केळापूर विधानसभा प्रमुख तथा यवतमाळ जिल्हा भाजपा सरचिटणीस रवि बेलुरकर, भाजपाचे घाटंजी तालुका अध्यक्ष सुरेश डहाके, घाटंजी भाजपा शहर अध्यक्ष बाळु उर्फ राम खांडरे, मिडीया सेलचे जिल्हा प्रमुख अभिजित झाडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस दिलीप पवार, भाजपा युवा मोर्चाचे घाटंजी तालुका अध्यक्ष चेतन जाधव आदीं उपस्थित होते.