सय्यद नजाकत
जालना , दि. ०४ :- हसनाबाद पोलीसांनी रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास गिरजा नदीच्या पात्रातून ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या वाळू चोरुन नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाळू माफियांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते पसार झाल्याने त्यांच्या ताब्यातील १५ लाखांची वाळु, १ जेसीबी व ३ ट्रॅक्टर असा एकुण ३५ लाख १५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
हसनाबाद पोलीस ठाण्याचे पो.ना. उबाळे व पो.शि. राठोड हे गस्त करीत असतांना त्यांना मिळालोल्या गोपनीय माहितीवरुन बोरगाव तारु परिसरात गिरजा नदीच्या पात्रातून जेसीबीने ट्रॅक्टरमध्ये रेती भरुन ती चोरुन नेत असल्याची माहिती मिळाली होती यावरुन ते घटनास्थळी गेले असता जेसीबी ऑपरेटर व ट्रॅक्टर चालक पोलीसांचे वाहन पाहून तेथून पळून गेले त्यामुळे पोना उबाळे यांनी सपोनि एम.एन.शेळके व तहसील कार्यालयातील लिपीक अनिल वानखेडे यांना संपर्क करुन सदरील माहिती दिली त्यावरुन सपोनि शेळके यांच्यासोबत पोना प्रताप चव्हाण व पोशि गणेश मांटे यांच्यासह सदर ठिकाणी गेले तसेच लिपीक वानखेडे, स्वप्नील देवकाते, श्रीकृष्ण बकाल व चालक गणेश वाघमारे दुसर्या वाहनातून आले त्यांनी वाहनाचा व घटनास्थळाचा पंचनामा करुन १ जेसीबी (वाहन क्र. एम. एच.२१ बी. एफ. ७८६२), ट्रॅक्टर (क्र. एम. एच. २१ ए. डी.३२०४) दोन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर असा एकुण ३५ लाख १५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वाळुची चोरटी उत्खनन व वाहतुक करणार्यांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यासाठी तहसीलदार भोकरदन यांनी अहवाल सादर केला आहे.
दरम्यान जेसीबी मालक नारायण कुंडलिक पवार (रा.चांदई एक्को), वाहन ऑपरेटर संदिप गणेशराव दाभाडे (रा.डोंगरगाव), ट्रॅक्टर मालक पंडीत कडुबा गाढे (रा.देऊळगाव ताड), ट्रॅक्टर चालक श्रीमंत पंडीत गाढे, ट्रॅक्टर मालक अंकुश रामदास चव्हाण (रा. धोंडखेडा), ट्रॅक्टर चालक समाधाान प्रल्हाद गाढे व परमेश्वर विनायक ढसाळ (रा. बोरगाव तारु) यांच्याविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.