Home सोलापुर हॅलो मेडिकलचा उपक्रम , कौटुंबिक जिव्हाळ्यासाठी समजूतदारपणाची भूमिका महत्त्वाची

हॅलो मेडिकलचा उपक्रम , कौटुंबिक जिव्हाळ्यासाठी समजूतदारपणाची भूमिका महत्त्वाची

184

अणदूर येथे दोनशे समजदार जोडीदारांचा मेळावा उत्साहात….

अक्कलकोट , दि. ०४ :- जीवन जगत असताना कौटुंबिक जिव्हाळा निर्माण करायचा असेल तर माणसाकडे समजूतदारपणाची भूमिका असली पाहिजे सहनशक्तीला कधी कधी मर्यादा असते पण ती समजून घ्यायला कधीच नसते त्यामुळे प्रत्येकाला कुटुंबात जर समजून घेतले
तर वाद-विवाद टाळता येतील, असे मत ज्येष्ठ साहित्यिका वीणाताई गवाणकर (मुंबई) यांनी केले.रविवारी, हॅलो मेडिकल फाऊंडेशन अणदुर तर्फे आयोजित समजदार जोडीदार प्रकल्पांतंर्गत दोनशे जोडप्यांचा सामूहिक मेळावा घेण्यात आला.त्यावेळी नातेसंबंध या विषयावर मार्गदर्शन करताना गवाणकर बोलत होत्या.पुढे बोलताना गवाणकर म्हणाल्या, शहरी संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होत चालली आहे ग्रामीण भागात अजूनही ती कायम आहे लहानपणापासून जर आपल्या मुलावर चांगले संस्कार झाले तर ती पुढे जाऊन नाव कमावतील ती सुद्धा आपली मोठी संपत्ती होऊ शकते.समजदार जोडीदार प्रकल्पांमध्ये पती-पत्नी यांच्यामधील संवाद चांगला असायला हवा.
एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घराघरांमध्ये होणारा तणाव कमी करता येऊ शकतो,असे त्या म्हणाल्या.दिवसभर चाललेल्या या मेळाव्यात आयुकाचे वैज्ञानिक नरेश गदिच, साधना गदिच (पुणे),ज्ञानप्रबोधिनीचे विवेक गिरीधारी, स्नेहा गिरिधारी (पुणे), टाईम्सचे नाऊचे संपादक प्रशांत जाधव,लेखिका हर्षदा परब, न्यूज एटीन लोकमतचे निवेदक विशाल परदेशी, मोनाली परदेशी ( मुंबई), प्रा. अभय जायभाये, प्रा. मयुरी सामंत (लातूर), भगीरथ कुलकर्णी अंदुर,पत्रकार मारुती बावडे सुप्रिया बावडे (अक्कलकोट) या समजदार जोडीदारांचा समावेश होता.या जोडीदारांनी पहिल्या टप्प्यात दोनशे जोडीदारांचे दहा गट करून कौटुंबिक हिंसाचार, स्त्री-पुरुष समानता, कौटुंबिक नातेसंबंध यावर गटचर्चा केली. त्यावेळी लोहारा,तुळजापुर, अणदूर या भागातील जोडीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानंतर दुपारच्या सत्रात न्यूज एटीन लोकमतचे निवेदक विशाल परदेशी यांनी गट समन्वयक म्हणून सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांच्या कौटुंबिक नातेसंबंध व समजदार जोडीदार या विषयावर मुलाखती घेतल्या या मुलाखती दरम्यान त्यांनी सर्व समजदार जोडीदारांच्या आयुष्याच्या गमतीजमती उलगडून दाखवल्या. प्रास्ताविकात संस्थेचे प्रमुख डॉ. शशिकांत अहंकारी म्हणाले की ,समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचार आणि स्त्री-पुरुष असमानता वाढली आहे या पार्श्वभूमीवर जोडीदार समजदार व्हावेत आणि पुरुष प्रधान संस्कृती कमी व्हावी अशा कार्यक्रमातून स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावे याकरिता हा मेळावा घेण्यात आल्याचे डॉ. अहंकारी यांनी सांगितले. दरवर्षी अशा प्रकारच्या मेळाव्याचे आयोजन करून आम्ही समाजामध्ये स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने काम करून समजदार जोडीदार होऊ शकतात हे सिद्ध करून दाखविले आहे,असे डॉ.शुभांगी अहंकारी यांनी सांगितले. प्रारंभी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि जानकीबाई अहंकारी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प समन्वयक बसवराज नरे, प्रबोध कांबळे, जावेद शेख, बालाजी जाधव, प्रसन्न कंदले, नागिनी सुरवसे ,सुप्रिया रोडे, दिनेश गाढवे, गुलाब जाधव, जाकीर शेख यांच्यासह हॅलोचे विविध विभागाचे समन्वयक, प्रकल्प कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बसवराज नरे यांनी केले तर आभार डॉ. शुभांगी अहंकारी यांनी
मानले.

चौकट :- कौटुंबिक रहस्य उलगडले

हॅलो मेडिकल फाउंडेशनने घेतलेल्या या समजदार जोडीदार प्रकल्पाच्या मेळाव्यात प्रत्येकाकडून कौटुंबिक जिव्हाळ्याचे रहस्य उलगडले. यात दोनशे जोडप्यांच्या मनमोकळ्या गप्पा झाल्या. अनेकांची या विषयावरची मते प्रकट झाली. या एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने वातावरण
भारावून गेले होते.