( साहेबराव पाटील कदम आणि राठोड यांच्या निवेदनाची तात्काळ दखल )
महागाव / हरिश कामारकर
गेल्या दोन दिवसापासून चालू असलेल्या सततधार पावसामुळे तालुक्यांतील सर्व नदीला नाल्यांना मोठया प्रमाणावर पूर परिस्थीती निर्माण झालेली आहे. यामुळे अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे, यातच तालुक्यातील हिवरा संगम नजिक धनोडा व आनंदनगर भागात एकूण सुमारे ८५ नागरिक संकटात अडकल्याची माहिती समोर येत आहे. या नागरिकांना वाचविण्यासाठी स्थानिक प्रशासन हतबल झाल्याने हिवरा सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील कदम व जिल्हा बँकेचे संचालक शिवाजीराव राठोड यांनी आज मुंबई येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन या नागरिकांना वाचविण्यासाठी हेलिकॉप्टरची आवश्यता असल्याची निवेदनाद्वारे विनंती केली.
जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरल्याने तालुक्यातून वाहणाऱ्या पुस, पैनगंगा व शिप नदीला पूर आला. यामुळे नदी किनाऱ्यावरील अनेक गावांचा संपर्क तुटला तर सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले आहे. या परिस्थितीत ये – जा करणारे व धोक्याच्या ठिकाणीं वास्तव्य करणारे अनेक लोक अडकलेले आहेत . या लोकांना दुपार पर्यंत दोरी किंवा इतर जलवाहतूकीतून सुरक्षित जागेवर पोहविण्यासाठी स्थानिक प्रशसनाला अपयश आल्याने आज परिसरातील माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील कदम, जिल्हा बँकेचे संचालक शिवाजीराव राठोड, बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, उपाध्यक्ष संजय देरकर, राजुदास जाधव यांनी पालकमंत्री राठोड यांची भेट घेऊन सदर परिस्थितिचा आढावा सादर करत बचाव कार्याच्या मोहिमेत हेलिकॉप्टर व जवान तैनात करण्याची मागणी केली.या निवेदनाची तात्काळ दखल घेत पालक मंत्री संजय राठोड यांनी राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक व संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून बातचीत करत याठिकाणी हेलिकॉप्टरची त्वरित व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनेनुसार दुपारी ०४.०० वाजेपर्यंत दोन हेलिकॉप्टर व जवानांची फौज तालुक्यात दाखल झाली. मात्र सदर ठिकाणीं कच्चे व टिनांचे घरे असल्याने या ठिकाणीं हेलिकॉप्टर पोहचल्यास अन्य नुकसान मोठया प्रमाणात होऊ शकते या परिस्थतीचा अंदाज घेत हेलिकॉप्टर त्या ठिकाणावर न नेण्याचा निर्णय चालकांकडून घेण्यात आला. त्यामुळे या हेलिकॉप्टर सोबत आलेल्या एसडीआर एफ च्या टीमने बोटिव्दारे युद्ध पातळीवर या बचाव कार्यास सुरूवात करून अनेकांना सुखरूप सुरक्षित ठिकाणीं हलविले. याचबरोबर सदर परिस्थितीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून सातत्याने आढावा घेत कारवाईच्या सूचना देण्यात येत आहे. पुराच्या भीषण परिस्थिती बाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केलेल्या मागणीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संजय राठोड व राज्य प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील कदम यांनी आभार व्यक्त केले.