सदोबा सावळी ( प्रतिनिधी )
आर्णी तालुक्यातील खडका (काप.) येथील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी ईतर साथीदारांशी संगनमत करुन स्थावर मालमत्तेचे बनावट दस्तावेज बनवून अनेक गैरप्रकार केले असून यातून लाखों रुपयाची उलाढाल झाली असल्याची तक्रार तहसिल कार्यालय आर्णी येथे नोंदविली गेली.
सविस्तर वृत्त असे की, आर्णी तालुक्यातील खडका (काप.) येथील ग्रामपंचायत चे सरपंच व ग्रामसेवक कैलास आडे यांनी यांच्या ईतर साथीदारांच्या मदतीने चक्क बनावट दस्तावेज बनवून गावात सतत गैरहजर राहणाऱ्या लोकांचे प्लॉट , खुली जागा, यांचे अनुपस्थितीत नियमबाह्य पद्धतीने मोजणी करून उर्वरित जागेची परस्पर विक्री केली.
अमोल कोमावार यांनी तहसिलदार यांना दिलेल्या तक्रारी नुसार लोअर पैनगंगा प्रकल्पातील बुडीत क्षेत्रात संबंधीत खडका गाव येत असल्या कारणाने धरणग्रस्त प्रमाणपत्र मिळवून शासकिय नोकरीत भविष्यात लाभ मिळण्याच्या दृष्टीने अनेक जण धरणग्रस्त क्षेत्रात आपली राहण्यायोग्य जागा खरेदी करतात आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन संबधित ग्रामसेवक कैलास आडे याने आपल्या अधिकार व पदाचा पुरेपूर वापर करून अनेक लोकांना बनावट दस्तावेज बनवून चुना लावला व लाखो रुपयांची माया जमविली आहे.या संदर्भात उच्च स्तरावरून चौकशी करून दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी व अवैध खरेदी खत, विक्री पत्र तात्काळ रद्द करण्यात यावी.
या संदर्भात सविस्तर माहिती नुसार पुढील कारवाही यवतमाळ अप्पर जिल्हाधिकारी श्री.दुबे साहेब यांच्या मार्गदर्शनात श्री. भोसले ,तहसिलदार, आर्णी .हे करित आहेत.