Home यवतमाळ घाटंजी तालुक्यातील टिटवी येथील ग्रामसेवक, कंत्राटी कनिष्ठ अभियंता व ग्राम रोजगार सेवक...

घाटंजी तालुक्यातील टिटवी येथील ग्रामसेवक, कंत्राटी कनिष्ठ अभियंता व ग्राम रोजगार सेवक आदींना तिन वर्षांचा सश्रम कारावास व 30 हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा..!

81

➡️ घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल अरुण उत्पात यांचे आदेश..!

( अयनुद्दीन सोलंकी,)
————————-
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील टिटवी येथील ग्रामसेवक बापु खंडू पाटील (53), ग्राम रोजगार सेवक विवेकानंद प्रभाकर तोडकरी (48) व कंत्राटी कनिष्ठ अभियंता कु. जया त्रेबंक ढोके (43) या तिघांना भादंवि कलम 420, 34 अंतर्गत दोषी आढळल्याने घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल अरुण उत्पात यांनी तिन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी 30 हजार रुपये द्रव्य दंड, द्रव्य दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली. तसेच भादंवि कलम 409, 467, 468 व 34 अन्वये निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षातर्फे 12 साक्षदार तपासण्यात आले. पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ॲड. एन. आर. गायकवाड यांनी मांडली.

घाटंजी पंचायत समिती अंतर्गत टिटवी येथे राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामपंचायत टिटवी येथील सौ. पंचफुला किसन आत्राम हिच्या वैयक्तिक सिंचन विहीरीच्या कामात झालेल्या आर्थिक अनियमितता व अपहार प्रकरणी दोषी आढळलेल्या कर्मचारी, अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अपहारातील रक्कम 76 हजार 950 रुपये वसुली करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी अजय राठोड यांना आदेशित केले होते.

तत्पूर्वी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता, बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आदींनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून 26 जुन 2012 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे चौकशी अहवाल सादर केला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अपहारातील रक्कम 76 हजार 950 रुपये वसुल करण्याचे आदेश दिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावरून घाटंजी येथील गट विकास अधिकारी अजय राठोड यांनी पारवा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यावरुन पारवा येथील ठाणेदार पंजाब सुखदेव वंजारी यांनी तिन्ही आरोपी विरुद्ध गुन्हे नोंदवुन तपास सुरू केला होता. त्यात ग्रामपंचायत स्तरावर विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी ही ग्रामसेवकाची असते. परंतु टिटवी येथील चौकशी अहवालात सदर विहिरीचे कोणतेही खोदकाम केलेले नाही.

त्यामुळे टिटवी येथील आरोपी ग्रामसेवक बापु खंडू पाटील, ग्राम रोजगार सेवक विवेकानंद तोडकरी व कंत्राटी कनिष्ठ अभियंता कु. जया ढोके आदिंना घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल अरुण उत्पात यांनी तीन वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्य दंड 30 हजार रुपये ठोठावला. द्रव्य दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची साधी शिक्षा ठोठावण्यात आली.

सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. एन. आर. गायकवाड यांनी बाजू मांडली. तर आरोपीतर्फे ॲड. श्याम कापरेकर व नंतर ॲड. एजाज तगाले (यवतमाळ) यांनी काम पाहिले.