➡️ आरोपी ज्ञानेश्वर हेलांडे विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल..!
(अयनुद्दीन सोलंकी)
————————
घाटंजी, 6 ऑक्टोंबर :– घाटंजी तालुक्यातील तळणी येथील दि. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी शाखा व्यवस्थापक अरविंद काशिनाथ कोरे (52) यांच्या लेखी तक्रारीवरुन आरोपी ज्ञानेश्वर मनोहर हेलोंडे (40) (रा. डांगरगाव पो. तळणी ता. घाटंजी) विरुद्ध भादंवि कलम 420, 468, 465 व 471 तसेच प्रतिबंधक कारवाई म्हणून मुंबई पोलीस कायदा 107, 116 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सद्यातरी आरोपी ज्ञानेश्वर हेलांडे हा फरार असुन घाटंजी पोलीस त्याचा शोध घेत आहे. घाटंजीचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक नागेश खाडे हे पुढील तपास करीत आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगरगांव येथील आरोपी ज्ञानेश्वर मनोहर हेलोंडे याने त्याची मावशी सन 1988 साली मय्यत झालेली होती. मात्र, आरोपी ज्ञानेश्वर हेलांडे याने किसनाबाई या बाईला मावशी म्हणून तळणी येथील दि. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या शाखेत हजर करुन सन 2016 साली बनावट जाॅईंट खाते उघडले. तसेच शासनामार्फत प्राप्त झालेल्या अनुदानाची रक्कम तळणी येथील दि. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतुन संबंधित बॅंकेला खोटे दस्तऐवज सादर करुन मय्यत मावशीच्या खात्यातून 88 हजार 200 रुपयाची उचल केली व आरोपीने दि. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तळणी शाखेची दिशाभूल व फसवणूक केली. अशा शाखा व्यवस्थापक अरविंद कोरे यांच्या लेखी फिर्यादी वरुन घाटंजी पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी ज्ञानेश्वर हेलांडे विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप निरीक्षक नागेश खाडे हे पुढील तपास करीत आहे.