मुबंई- भारतीय कामगार चळवळीचे कॉम्रेड डांगे हे अग्रगण्य नेते होते. डांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगार लढवय्या झाला आणि अनेक दशके त्यांनी रोमहर्षक संघर्ष केला १९२० पासून डांगे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामात भाग घेतला, भारतीय कामगार चळवळीचा जन्म, बाल्यावस्था व निरनिराळ्या स्थित्यंतरातून जात असताना आलेले अडथळे आणि झालेला विकास याचे ते साक्षीदार होते.
लाखो कामगारांची संख्या असलेल्या आयटक या भारतातील मोठ्या संघटनेचे ते अनेक वर्षे सरचिटणीस होते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीचे एक नामवंत पुढारी होते. त्यामुळे त्यांचे जगभरच्या सुप्रसिद्ध नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. आंतरराष्ट्रीय राजकारण व कामगार चळवळ यात डांगें यांच्याइतकी मान्यता इतर कोणत्याही कम्युनिस्ट नेत्यास प्राप्त झाली नाही असे मत प्रा. डॉ. अशोक चौसाळकार यांनी मांडले.
मुंबईतील माजी नगरसेवक कॉम्रेड जयवंत पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कॉम्रेड डांगे यांच्या १२४ वा जयंती कार्यक्रम प्रभादेवी येथील ‘भुपेश गुप्ता भवनात आयोजित केला होता,चौसाळकर हे “कॉम्रेड डांगे आणि कम्युनिस्ट चळवळ” या विषयावर आपले विचार मांडत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकवाड्मय गृहाचे कॉ राजन बावडेकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई सचिव कॉ मिलिंद रानडे, कॉम्रेड प्रा क्रांती जेजुरकर, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इस्त्राएल आणि हमास यांनी एकमेकांवर हल्ले करून युद्ध सुरु केल्यामूळे निरपराध नागरिकांची हत्या होत आहे या नरसंहाराचा निषेध करून ठराव करण्यात आला. हा ठराव कॉ मिलिंद रानडे यांनी मांडला त्यावेळी त्यांनी आवाहन केले की, फॅसिझमच्या विरोधात लढताना पक्षाची ताकद कमी असेल किंबहुना त्यांचा पराभव करण्यासाठी आमच्याकडे साधने कमी असतील परंतु कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी सरकारच्या न पटणाऱ्या धोरणाविरोधात आणि अन्यायाविरूद्ध आवाज उठवला पाहिजे.
S3चौसाळकर यांनी डांगे यांच्या बालपणापासून १०२० ते १९८० या कालखंडातील आयुष्याचे चार भागात विभागणी करून विषयाची मांडणी करताना पुढे म्हणाले की, कॉ. डांगे हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे व संस्कृतीचे खोल असे अभ्यासक होते. महाराष्ट्राच्या राष्ट्रकाची जडणघडण कशी झाली हे पाहण्यात त्यांना आस्था होती. मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य निर्माण झाले पाहिजे, असे त्यांचे मत होते. भारतीय संघराज्य हे स्वतंत्र, स्वायत्त घटकराज्यांचा संघ असावा अशीच त्यांची या बाबतची भूमिका होती. त्यामुळे भाषावार प्रांतरचनेस त्यांचा पाठिंबा होता. डांगे हे जनतेचे पुढारी होते. डांगे यांचे संपूर्ण जीवन अभ्यासले तर ते समाजातील पीडित, शोषित व दारिद्राने गांजलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी वाहिलेले होते हे लक्षात येते. ते अत्यंत उत्तम वक्ते आणि नेहमी चळवळीत व्यस्त असत. स्वातंत्र्यत्तोर भारतातील अनेक चळवळीत ते अग्रभागी होते. आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर अनेक सभा त्यांनी जिंकल्या होत्या. कॉम्रेड डांगे यांनी रशियाच्या सर्वोच्च नेत्यांशी गाठीभेटी होत असत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीची भूमिका सातत्याने वेगवेगळ्या परिषदांत मांडली, म्हणून त्यांना वयाच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त रशियन सरकारने लेनिन पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला होता. गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यांनी हिरीरीने लढविली. डांगे हे इतिहास, साहित्य व संस्कृती यांचे श्रेष्ठ भाष्यकार होते. खऱ्या अर्थाने कॉ डांगे हे एकोणिसाव्या व विसाव्या शतकात सुरु झालेल्या प्रबोधन पर्वाचे अपत्य होते व त्या व्यापक चळवळीचे ते शेवटचे प्रतिनिधी होते.
कॉम्रेड प्रा क्रांती जेजुरकर या आपल्या भाषणात म्हणाल्या की, कॉ डांगे यांचे वक्तृत्व असाधारण होते. मैदानी सभा गाजवणारे डांगे कमालीचे मिश्किल होते. त्यांच्या घरी गेल्यानंतर चर्चा करताना साहित्य, संस्कृती, कला व इतिहास यांचा त्यांनी सखोल असा अभ्यास केला होता हे माझ्या लक्षात आले होते.
तर रवींद्र मालुसरे आपल्या भाषणात म्हणाले की, लोकमान्यांचे २ ऑगस्ट १९२० रोजी मुंबईत निधन झाल्यानंतर त्यांना अग्नी दिला त्या ठिकाणी एक तरुण पहाटे जातो, त्याच्या डोळ्यात अश्रू आणि मनात असंख्य वेदना असतात. दुःखी अंतःकरणाने तो तरुण त्याठिकाणची चिमूटभर राख सोबत आणलेल्या डबीत घरी घेऊन जातो आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत देवघरात ठेवतो. तो तरुण म्हणजे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे होत, तरुण डांगे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. चारित्र्य, स्वार्थत्याग, झुंजारपणा व आलेल्या संधीची आपल्या अंगीकृत कार्यार्थ राबवून घेण्याची मुत्सद्देगिरी याबाबत डांगे फक्त टिळकांशी बरोबरी करतात. माडखोलकरांनी व्यक्त केलेल्या मताशी सर्वजण सहमत आहेत. कॉम्रेड डांगे यांनी गिरणगावात कामगारांचा लढा लढवताना संघर्ष केला, सर्वत्र लाल झेंडे लावले, गिरण्यांचे गेट अडवले मात्र कम्युनिस्ट चळवळ थंडावल्यानंतर गिरण्यांचे भोंगे जाऊन मोठमोठे टॉवर्स उभे राहिले आहेत. डांगे सारखे संघर्ष करणारे नेते आणि कॉ जयवंत पाटलांसारखे तळागाळात जाऊन निष्ठेने आणि निर्भयपणे काम करणारे कार्यकर्ते सुद्धा आज राहिले नाहीत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ मधुकर कदम यांनी केले. कॉ अनंत मोरे, कॉ बाबा सावंत,कॉ चित्तरंजन कांबळे,कॉ विश्वनाथ घवाळी, कॉ विजय मोरे, कॉ बबन वगाडे, कॉ प्रकाश बागवे, कॉ मंगला सावंत, कॉ नंदा जाधव, कॉ लक्ष्मण चिंतल, कॉ मामिडाल या जन्मशताब्दी समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.