Home विदर्भ जर शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे न संपवता राज ठाकरे यांना दिले...

जर शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे न संपवता राज ठाकरे यांना दिले असते तर…..?

79

नागपूर – शिवसेना पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरे यांचेकडे न सोपवता जर राज ठाकरे यांच्याकडे सोपवली गेली असती तर महाराष्ट्रातील मराठी माणसाचे निश्चित भले झाले असते अशा आशयाचे विधान शिवसेना शिंदे गटाचे एक नेते रामदास कदम यांनी केले असल्याचे वृत्त सुमारे दोन दिवसांपूर्वी माध्यमावर प्रसारित झाले आहे. या वृत्ताने राजकीय वर्तुळात फारशी खळबळ माजली नसली तरी शिवसेनेच्या दोन्ही गटात म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिल्लक शिवसेना यात चर्चा निश्चित सुरू झाली आहे. एकूणच सर्व शिवसेनाप्रेमींना विचार करायला लावणारा मुद्दा रामदास भाईंनी चर्चेत आणला आहे हे नक्की.

रामदास कदम यांच्या या वक्तव्यावर काही भाष्य करायचे तर आपल्याला शिवसेनेच्या इतिहासात डोकवावे लागेल. शिवसेनेची स्थापना झाल्यावर अनेक वर्ष ठाकरे परिवारातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच एकहाती शिवसेना सांभाळत होते. अर्थात त्यांच्यासोबत त्यांचे अनेक निष्ठावंत सहकारी खांद्याला खांदा लावून काम करत होते. त्यामुळेच शिवसेना सतत वाढती राहिली. आधी मुंबई, ठाणे या परिसरात रुजलेली शिवसेना हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत गेली.

शिवसेनेच्या स्थापनेनंतर जवळजवळ २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेनेत सक्रिय झाले. त्यावेळी राज ठाकरे यांच्या पेक्षा वयाने ज्येष्ठ असलेले उद्धव ठाकरे हे आपल्या फोटोग्राफी कलेची जोपासना करण्यातच व्यस्त होते. राज ठाकरे यांनी शिवसेनेचीच एक शाखा म्हणून महाराष्ट्र विद्यार्थी सेना ही संघटना उभी केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील युवाशक्ती मोठ्या प्रमाणात बाळासाहेबांच्या पाठीशी आणून उभे केली. याच दरम्यान तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मतदानाचे वय २१ वरून १८ वर आणले होते. युवाशक्ती शिवसेनेच्या बाजूने उभी झाल्यामुळे या बदलाचा त्यांना फायदा मिळाला.

१९८० आणि १९८५ या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेना कुठेच नव्हती. याच काळात शिवसेनेने सांधा बदलला. आधी मराठी माणसासाठी खंबीरपणे उभी असलेली शिवसेना आता हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन हिरिरीने पुढे येऊ लागली. परिणामी मुंबईतील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच हिंदुत्व प्रेमी नागरिक शिवसेनेच्या जवळ जाऊ लागले. याच संधीचा फायदा घेत तत्कालीन भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी बाळासाहेबांशी चर्चा करून महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची युती घडवून आणली. त्याचा फायदा भाजपसोबत शिवसेनेलाही मिळाला. विधानसभेत भाजप आणि शिवसेनेचे बऱ्यापैकी आमदार गेले, आणि १९९० च्या विधानसभा निवडणुकी नंतर काही काळ विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेकडे राहिले. याच दरम्यान म्हणजेच १९८९आणि १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे काही खासदारही लोकसभेत गेलेले दिसले. या सर्व काळात राज ठाकरे हे शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे इतर सर्व सहकारी यांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय होते. इतकेच काय पण या काळात बाळासाहेबांचा शिवसेनेतला वारस कोण हा प्रश्न जेव्हा समोर येत होता तेव्हा राजकीय विश्लेषक आणि सामान्य शिवसैनिकही राज ठाकरे यांचेच नाव घेत होते. राज ठाकरे हे बाळासाहेबांप्रमाणेच व्यंगचित्रकार आणि त्यांचे व्यक्तिमत्त्वही काहीसे बाळासाहेबांसारखेच आहे, त्यामुळे त्याचबरोबर त्यांची वक्तृत्वशैली आणि देहबोली सुद्धा बाळासाहेबांसारखीच आहे .या सर्वांचा परिणाम म्हणून की काय, पण सर्वच जण बाळासाहेबांचा पुढचा वारसदार आणि पुढला शिवसेनाप्रमुख म्हणून राज ठाकरे यांना बघू लागले होते.

साधारणपणे १९९० नंतर शिवसेनेची ताकद वाढती आहे असे दिसून आल्यावर आणि आता किमान महाराष्ट्रात तरी भाजपसोबत शिवसेना सत्तेत येईल असे चित्र दिसायला लागल्यावर उद्धव ठाकरे यांची शिवसेनेत राज ठाकरे यांच्या समवेत एन्ट्री झाली. अर्थात बाळासाहेबांचे चिरंजीव असल्यामुळे त्यांना राज ठाकरे यांच्याच बरोबर किंबहुना थोडा जास्तच मान मिळू लागला. सुदैवाने १९९५ मध्ये भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांची सत्ता महाराष्ट्रात आली. प्रथमच महाराष्ट्रात गैरकाँग्रेसी सरकार सत्तेत आले होते. त्यामुळे जनसामान्यांच्या शिवसेनेकडून अपेक्षा वाढल्या होत्या. त्या काळात शिवसेनेचे बहुतेक सर्व ज्येष्ठ नेते हे सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे शिवसेनेची धुरा सांभाळण्यासाठी बाळासाहेबांसोबत उद्धव आणि राज हे दोघेच होते. याचा परिणाम असा झाला की हळूहळू राज ठाकरे यांच्या समवेत उद्धव ठाकरे यांचेही वजन शिवसेनेत आणि पर्यायाने राजकारणात वाढू लागले. त्याच काळात झालेले रमेश किणी प्रकरण राज ठाकरे यांना काहीसा सेटबॅक देऊन गेले. त्याचा परिणाम म्हणून की काय पण उद्धव ठाकरे वेगाने पुढे सरकले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांचे चिरंजीव म्हणून उद्धवपंत यांची शिवसेनेतली ताकद निश्चितच वाढत होती. असे असले तरी राज ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग शिवसेनेत त्यावेळी सक्रिय होता. त्यात बाळा नांदगावकर, शिशीर शिंदे, परुळेकर पती-पत्नी अशी अनेक नावे घेता येतील. हे सर्व शिलेदार त्यावेळी तरी राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ होते.

१९९९ साली झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची महाराष्ट्रातील ताकद थोडी कमी झाली. भाजपच्याही काही जागा कमी झाल्या. परिणामी महाराष्ट्रातून सत्ता गेली. अर्थात केंद्रात सत्ता होतीच. मनोहर जोशी, सुरेश प्रभू, आनंद अडसूळ, बाळासाहेब विखे, सुबोध मोहिते असे काही शिवसेना नेते केंद्रात मंत्रीही झाले होते. त्यामुळे शिवसेना ही पुन्हा केव्हाही महाराष्ट्रात सत्तेत येऊ शकेल हे चित्र निर्माण झाले होते.

२००० नंतर निवडणूक आयोगाच्या निकषामुळे शिवसेनेची संघटनात्मक बांधणी समोर आणावी लागली. त्यावेळी शिवसेनेचा अध्यक्ष कोणाला करायचे असा प्रश्न पुढे आला. अर्थात हे अध्यक्षपद ठाकरे कुटुंबातीलच कोणाला तरी दिले जाणार होते. त्यात मग राज की उद्धव असा प्रश्न निर्माण झाला. २००३ मध्ये झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांचे नाव शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून सुचवले आणि सर्वानुमते उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष बनले. इथूनच खरी संघर्षाला सुरुवात झाली.

उद्धवपंत ठाकरे यांच्या हातात शिवसेनेची सूत्र सोपवल्यावर बाळासाहेब हळूहळू निवृत्तीपंथाला लागले होते. या काळात उद्धव ठाकरे यांनी हळूहळू आपली ताकद वाढवायला सुरुवात केली. त्यांना आपली स्पर्धक माणसे नको होती. अशांना हेरून त्यांना बाजूला करणे त्यांनी सुरू केले. त्यात पहिला क्रमांक लागला तो नारायण राणे यांचा. २००५ मध्ये राणे यांना शिवसेनेतून काढले गेले. मात्र चित्र असे उभे केले की राणेच बाहेर निघाले आहेत. हळूहळू एकेकाचा नंबर लागू लागला. यावेळी राज ठाकरे यांना जरी बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू केली नव्हती, तरी त्यांना कुठेतरी अडगळीत टाकायला सुरुवात करतो आहे हे जाणवून देणे सुरू झाले होते. त्यामुळे त्रस्त झालेले राज ठाकरे यांनी २००५ च्या नोव्हेंबर
मध्ये बंडाचा झेंडा उभारला. बाळासाहेब माझे दैवत आहेत, तो तर माझा पांडुरंग आहे. मात्र माझ्या पांडुरंगाला बडव्यांनी घेरले आहे, असे विधान करत राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर झाले, आणि थोड्याच दिवसात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. बाळासाहेबांची शैली आणि देहबोली उचलली असल्यामुळे आणि बाळासाहेबांचाच मराठीचा मुद्दा पुढे घेऊन राज ठाकरे मैदानात उतरल्यामुळे त्यांना सुरुवातीच्या काळात समर्थन चांगले मिळाले. २००७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले अस्तित्व निर्माण केले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत तर मनसेचे चक्क १३ आमदार विजयी झाले होते. ही ताकद राज ठाकरे यांनी त्यावेळी दाखवली होती. त्यामुळे बाळासाहेबांना दैवत मानून त्यांचा पुढला वारस मीच होऊ शकेल हे चित्र निर्माण करण्यात राज ठाकरे यशस्वी झाले होते.

मधल्या काळात राज ठाकरे यांनीही काही कोलाटउड्या मारल्या. त्यामुळे की काय तर विधिमंडळातील किंवा महापालिकेतील त्यांचे वजन थोडे कमी झालेले दिसले. असे असले तरी नाशिक महापालिकेतील काही काळ मिळालेली सत्ता ही देखील त्यांची लक्षणीय कामगिरी राहिली. हे बघता गेल्या सतरा अठरा वर्षातील त्यांची राजकीय कामगिरी अगदीच दुर्लक्ष करण्याजोगी राहिली नाही. आजही निवडणुकीच्या रिंगणात स्वतःचे उमेदवार निवडून आणण्याची कदाचित ताकद नसली तरी इतरांचे उमेदवार पाडण्याची ताकद निश्चित असणारा पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे बघितले जाते आहे. त्यातही शिल्लक शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी ते केव्हाही फायद्याचे ठरू शकतात अशी त्यांची ताकद आहे.

दरम्यानच्या काळात उद्धव आणि राज या दोन भावांनी एकत्र यावे असे अनेकदा प्रयत्न झाले. या प्रयत्नांना राज ठाकरे यांनी प्रतिसाद दिला असे चित्र तरी निर्माण केले गेले. मात्र उद्धव ठाकरे यांचा कधीच प्रतिसाद दिसला नाही. दरम्यानच्या काळात शिवसेनेतून हळूहळू जुन्या बाळासाहेबांच्या विश्वासू माणसांना दूर करण्याची प्रक्रिया सुरू केली गेली. मनोहर जोशींसारखा शिवसेनेचा निष्ठावंत नेता, त्यालाही शिवाजी पार्कवर अवमानित करण्यात आल्याची घटना घडली. यावेळी उद्धव ठाकरेही तिथे होते. असे अनेक प्रकार घडले. बाळासाहेबांच्या काळात जे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जात होते ते सर्व बाजूला सारले गेले आणि संजय राऊत नार्वेकर अनिल परब असे नवनवे खेळाडू पुढे येत गेले. त्यातून २०१४ मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तोडण्यापर्यंत पाळी आली. युती तोडून विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या गेल्या. परिणाम उभ्या महाराष्ट्राने बघितला. ज्या भाजपाला शिवसेना धाकटा भाऊ म्हणून हिणवत होती, कमळाबाई म्हणून टिंगल करत होती, त्या भाजपाने शंभरी गाठत सर्वात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रात स्थान मिळवले आणि शिवसेनेला सत्तेत येण्यासाठी नाकदूऱ्या काढायला लावल्या. हा तसा विचार करता शिवसेनेला एक मोठा धक्का होता. पाठोपाठ झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत सुद्धा भाजपच्या कुबड्या घेतच सत्ता मिळवावी लागली होती.

याच काळात शिवसेना हळूहळू हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दूर जाताना दिसली. भाजपशी पंगा घ्यायचा तर दुसरी ताकद हवी म्हणून शरद पवारांना जवळ केले गेले. त्याचा पुढचा परिणाम महाराष्ट्राने बघितला आहेच. २०१९ मध्ये भाजपशी असलेली युती तोडून शिवसेनेने निवडणुकीनंतर भाजपशी फारकत घेतली आणि पवारांशी तसेच काँग्रेसची अभद्र शयासोबत केली. ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी सतत शिवीगाळ केली होती, ज्या शरद पवारांना बारामतीचा ममद्या म्हणून जाहीररित्या हिणवले होते, त्या शरद पवारांकडे लाचार होऊन सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी चकरा मारल्या. इथूनच शिवसेनेची हिंदुत्ववाद्यांमधली इज्जत कमी झाली. नंतर ठाकरे घराण्यातील कोणालाही सत्तेत पद द्यायचे नाही हा बाळासाहेबांचा प्रघात मोडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.आदित्यलाही मंत्रीपद दिले. पुढल्या अडीच वर्षात काय घडले ते महाराष्ट्राने बघितलेच. परिणाम शिवसेना फुटण्यात झाला. आजवर शिवसेनेला इतके मोठे खिंडार कधीच पडले नव्हते. या सर्वांचा परिणाम म्हणून की काय, पण निवडणूक आयोगाने आता उद्धव ठाकरेंकडे जी काही शिल्लक शिवसेना आहे तिला शिवसेना म्हणून मान्यताही दिलेली नाही. एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी आहे असे म्हटले आहे. हा उद्धव ठाकरे यांचा दारुण पराभव म्हणावा लागेल. या सर्व प्रकारात शिवसेनेचा मूळ मराठी माणसाचा कैवार आणि नंतर हिंदुत्वाचा कैवार हे दोन्ही बाजूला पडलेले दिसून आले आहेत.

या सर्व घटनाक्रमातून निष्कर्ष काढायचा झाला तर बाळासाहेबांची जी शिवसेना होती, तिची पूर्ण वाट उद्धव ठाकरे यांनी लावली आहे हे स्पष्ट दिसून येते .आज मुंबई महापालिकाही शिवसेनेच्या हातात राहील किंवा नाही हे सांगता येत नाही. सर्व जुने शिलेदार शिवसेना सोडून गेले आहेत. नवीन जे आहेत तेही कितपत टिकतील हे सांगता येत नाही. जर पुढील निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाला जनतेने कौल दिला तर उरलेसुरले शिवसैनिकही शिंदेंकडे जाऊ शकतात, आणि संजय राऊत अनिल परब सारखे काही मोजकेच शिल्लक शिवसेनेसोबत राहतील हे वास्तव नाकारता येत नाही.

जर २००३ साली शिवसेनेची सूत्रं उद्धव ठाकरे यांचे ऐवजी राज ठाकरे यांचे हातात दिली असती तर चित्र वेगळे राहिले असते का असा प्रश्न निर्माण होतो. रामदासभाई कदम यांनी नेमका हाच मुद्दा मांडला आहे. राज ठाकरे यांच्यात उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत राजकीय परिपक्वता थोडी जास्तच आहे असे जाणवते. काहीसा आक्रमक स्वभाव आणि बाळासाहेबांची शैली आणि देहबोली या दोन्हीमुळे आजही जनतेला आपल्याकडून खेचून घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. बाळासाहेबांचे निधन २०१२ मध्ये झाले. त्यांच्या नावाचा करिष्मा काही काळ जरूर टिकला. मात्र तो पुढे टिकवण्यात आज तरी उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे यशस्वी ठरलेले दिसत नाहीत. आज शिवसेनेसोबत जे आहेत ते बाळासाहेबांच्या करिश्म्यामुळे आहेत. मात्र ते किती काळ टिकतील हे सांगता येत नाही.

राज ठाकरे यांनी २००६ ते आज २०२३ पर्यंत आपली संघटना उभी करण्यात खूप जरी नाही तरी लक्षणीय यश निश्चित मिळवले आहे. अर्थात त्यांनी २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यावेळी त्यांची शून्यातून सुरुवात होती. फक्त शिवसेनेतील काही निष्ठावंत सहकारी त्यांच्यासोबत होते. तरीही २००७च्या महापालिका निवडणुकीनंतर २००९ च्या विधानसभा निवडणुका यामध्ये त्यांनी आपले अस्तित्व जाणून दिले. या काळात मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी विविध आंदोलनही केली. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत येण्याचे स्वप्न तर फार दूरचे आहे. असे असले तरी शिवसेनेचे उमेदवार पाडण्याइतपत ताकद त्यांनी निर्माण केली आणि आजही टिकवून ठेवली आहे. हे सर्व शून्यातून सुरुवात करून त्यांनी उभे केले आहे.

अशावेळी जर त्यांना तयार मैदान मिळाले असते, तर कदाचित चित्र वेगळे राहिले असते असा निष्कर्ष काढता येतो. जर २००३ मध्ये राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रे सोपवली असती, तर शिवसेनेची पुण्याई आणि बाळासाहेबांचा करिष्मा त्यांना रेडीमेड मिळाला असता. अशा वेळी आपली राजकीय परिपक्वता आणि आक्रमक वृत्ती तसेच बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाल्यामुळे तयार झालेली राजकीय दृष्टी याचा फायदा घेत त्यांनी पुन्हा मराठी माणूस आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे हाताशी धरत महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि हिंदुत्व प्रेमी यांना संघटित निश्चितच ठेवले असते. जर मराठी माणूस आणि हिंदुत्वनिष्ठ एकत्र आले असते आणि ते शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले असते तर चित्र निश्चितच वेगळे राहिले असते. त्यातही २००३ ते २०१२ ही नऊ वर्ष त्यांना बाळासाहेबांच्या असण्याचाही फायदा मिळाला असता. आपल्या राजकीय परिपक्वतेतून एकूणच मराठी माणूस आणि मतदार जोडून ठेवण्यात ते यशस्वी झाले असते. आणि १९९९ पासून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची जी घसरण होत गेली ती थोपवण्यात तरी ते यशस्वी झाले असते असा कयास बांधता येतो. जर त्यांना संधी मिळाली असती तर त्यांनी शिवसेना महाराष्ट्रात सर्व दूर रुजवली असती आणि बाळासाहेबांचे स्वप्न निश्चितच साकार केले असते असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. अर्थात आज शिवसेनेची सूत्र राज ठाकरे यांच्या हातात आलीही तरी पडझड बरीच झाली आहे. त्यामुळे भविष्यात चित्र काय असेल ते सांगणे कठीण आहे.

वाचकहो तुम्हाला पटतय का..?

पटत असेलच…
पण आधी समजून तर घ्या राजे हो..

अविनाश पाठक

वाचक हो हा लेख तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. जर लेख आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा.

अविनाश पाठक