अमीन शाह ,
पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे एका रात्रीत क्रिकेटच्या ड्रीम ११ मधील तब्बल दीड कोटी रुपयांचे मानकरी ठरले होते. मात्र तेच बक्षीस आता त्यांच्या नोकरीवर गदा आणणारे ठरले आहे. पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत झेंडे यांचे निलंबन करण्यात आहे.
सोमनाथ झेंडे हे पिंपरी चिंचवड आयुक्तालयात कार्यरत होते. सध्या विश्वचषक सामने सुरू आहेत. त्यात त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या सामन्यावर टीम लावली होती. यात त्यांना बक्षीस लागल्याने ते सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती.
सध्या सुरु असलेल्या क्रिकेट विश्वचषकातील मॅचवेळी झेंडेंनी ड्रीम 11 या ऑनलाइन बेटिंग अँपवर स्वतःची टीम लावली अन् त्यात ती अव्वल ठरली. त्यामुळे झेंडे अवघ्या आठ तासांत करोडपती झाले. त्यांना दीड कोटींची लॉटरी लागल्यानं त्यांच्या कुटुंबीयांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. याच आनंदाच्या भरात झेंडेंनी वर्दीत माध्यमांना मुलाखती दिल्या अन हीच चूक त्या आनंदावर पाणी फिरवणारी ठरली.
पिंपरी चिंचवड पोलिसांनीच त्याची चौकशी केली अन् यात त्याचं निलंबन करण्यात आलं. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला, आता पुढे विभागीय चौकशी होईल त्यात त्यांना स्वतःचं म्हणणं मांडता येणार आहे.