Home यवतमाळ “आम्हाला न्याय द्या किंवा न्यायाची दुकाने बंद करा.” – दिगांबर पजगाडे

“आम्हाला न्याय द्या किंवा न्यायाची दुकाने बंद करा.” – दिगांबर पजगाडे

71

यवतमाळ –  302 कोटी रूपयांच्या यवतमाळ अमृत पाणी पुरवठा योजनेतील कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्यांविरूद्ध क्रिमीनल कारवाई करण्यात यावी, त्यांना तुरूंगात टाकण्यात यावे. या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाईप पुरवठा करणाऱ्या व पाईप योग्य असल्याचे बोगस टेस्ट रिपोर्ट देवून कोट्यावधी रूपयांचे बील काढून फसवेगिरी करणाऱ्या सर्व कंपन्यांना काळ्या यादीत टाकून त्यांना तुरुंगात टाकण्यात यावे. अमृत योजनेच्या कामाकरीता खोदण्यात आलेल्या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे. यवतमाळ शहरातील नागरीकांना 24 तास शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा आणि 302 कोटी रूपयाच्या यवतमाळ अमृत पाणी पुरवठा योजनेत कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्यांविरूद्ध कारवाई न करता त्यांना संरक्षण देणाऱ्या अमृत योजनेच्या भ्रष्ट अध्यक्षाला व क्रिमीनल महाराष्ट्र सरकारला तुरूंगात टाकण्याचे आदेश देण्यात यावे. या करीता यवतमाळ जिल्हा न्यायालयासमोर दि. 4 मार्च 2024 पासुन “सामुहिक आमरण उपोषण व धरणे आंदोलन.”

यवतमाळ शहरातील लाखो नागरिकांनो व माझ्या बंधू आणि भगिनींनो यवतमाळ शहरातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार व यवतमाळ नगर पालिका यांच्या माध्यमातून सन 2017 मध्ये 302 कोटी रूपयाच्या यवतमाळ अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले. हे काम 2019 मध्ये पुर्ण होवून यवतमाळ शहरातील नागरीकांना 24 तास शुद्ध पाणी पुरवठा व्हावा हे अपेक्षीत होते. यवतमाळ अमृत योजनेत 13.5 mm. जाडीचे पाईप टाकणे आवश्यक असतांना सुद्धा त्यांनी 13.5 mm. जाडीचे पाईप न टाकता अत्यंत निकृष्ट दर्जाचे 8.5mm. व 7.5 mm. जाडीचे पाईप टाकण्यात आले आणि हे पाईप टेस्ट न करता पाईप योग्य असल्याचे बोगस टेस्ट रिपोर्ट तयार करून कोट्यावधी रूपयांची बीले काढण्यात आली आहेत. योजनेचे पाईप टाकतेवेळी 500 मिटर पाईप टाकल्यानंतर त्यांची हायड्रोलिक टेस्टींग करून पुढील पाईप टाकणे आवश्यक असतांना सुद्धा या योजनेत टाकण्यात आलेल्या पाईपची हायड्रोलिक टेस्टींग करण्यात आली नाही आणि डायरेक्ट पाणी सुरू करण्यात आले. सदर पाईप 4.10 Mpa. इतक्या दाबावर टिकणे आवश्यक असतांना सदर निकृष्ट दर्जाचे पाईप 1.2 Mpa. इतक्या कमी दाबावर फुटावयास लागले. या पाईपच्या क्वालीटीची तपासणी VNIT, Nagpur ने दि. 19/7/2018 रोजी केली असता सदरचे पाईप अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहेत. तसेच पाईपच्या संदर्भात जे टेस्ट रिपोर्ट Q.S.S. या कंपनीने दिले आहेत हे टेस्ट रिपोर्ट देखील बोगस असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहेत.

यवतमाळ अमृत पाणी पुरवठा योजनेतील कोट्यावधी रूपयाच्या भ्रष्टाचाराची माहिती व चौकशी अहवाल अमृत योजनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाला दि. 7/8/2018 रोजी देण्यात आली होती परंतु भ्रष्टाचारी क्रिमीनल महाराष्ट्र सरकारचे व अमृत योजनेच्या अध्यक्षांचे अमृत पाणीपुरवठा योजनेची कामे करणाऱ्यांशी साटेलोटे असल्यामुळे या कोट्यावधी रूपयांच्या भ्रष्टाचाराविरूद्ध क्रिमीनल भ्रष्टाचारी महाराष्ट्र शासनाने व अध्यक्षाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. उलट त्यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. ही संपूर्ण योजना ‘भ्रष्टाचाराने सडल्यामुळे आजपर्यंत या योजनेचे काम पूर्ण होवू शकले नाही व यवतमाळकरांना नियमीत पाणी पुरवठा होवू शकला नाही. आठ दिवसातून एक वेळा नळाला पाणी येते याला क्रिमीनल भ्रष्टाचारी महाराष्ट्र सरकार व अमृत योजनेचा अध्यक्ष जबाबदार आहे.

या योजनेचे पाईप टाकण्याकरीता यवतमाळ शहरातील सर्व रस्ते खोदून निकृष्ट दर्जाचे पाईप टाकण्यात आले आहेत. या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करून दुरूस्ती न करता रस्त्यांची चाळणी करण्यात आली आहेत. या खड्यात पडून अनेक निर्दोष नागरीकांचा जीवन गेला असुन या खड्यांमुळे लोकांना चालणे व वाहणे चालविणे कठीण झाले आहे. रस्त्यावरील या खड्यांमुळे अनेक नागरीकांना मानेचा व कंबरेचा आजार झाला आहे.

302 कोटी रूपयाच्या अमृत पाणी पुरवठा योजनेतील या भ्रष्टाचाराविरूद्ध मी मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात क्रिमीनल जनहित याचिका (Cri. PIL No. 2/2019) दाखल केली असुन सर्व टेस्ट रिपोर्ट व चौकशी अहवाल केसमध्ये दाखल करण्यात आले आहेत. गेल्या 6 वर्षापासून या अत्यंत गंभीर व महत्वाच्या प्रकरणावर मा. उच्च न्यायालय देखील कारवाई करण्यास तयार नाही. म्हणून आपल्या न्याय हक्कासाठी, यवतमाळ शहरातील लाखो लोकांना 24 तास शुद्ध पाणी पुरवठा व्हावा. भ्रष्टाचारी महाराष्ट्र शासनाला व या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या सर्वांना तुरूंगात टाकण्यात यावे या करिता यवतमाळ जिल्हा न्यायालयासमोर न्याय मिळेपर्यंत दि. 04 मार्च 2024 पासून बेमुदत सामुहिक आमरण उपोषण व धरणा आंदोलन करण्यात येणार आहे. या करिता सर्व नागरीकांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलनात सहभागी व्हावे.