Home बुलडाणा शिकाऊ डॉक्टर तरुणीची छेड काढणारा डॉक्टर अविनाश सोळंकी अखेर निलंबित ,

शिकाऊ डॉक्टर तरुणीची छेड काढणारा डॉक्टर अविनाश सोळंकी अखेर निलंबित ,

29

 

 

अमीन शाह

बुलडाणा ,

जिल्हा महिला रुग्णालयाच्या नावाला कलंक लावणारा , असे कृत्य कंत्राटी तत्वावर नियुक्त केलेले भामट्या भूलतज्ज्ञ डॉ. अविनाश सोळंकी यांनी ११ मे 2024 रोजी रात्री केले. डीआरसी (डिस्ट्रिक्ट रेसिडेन्सी प्रोग्राम) अंतर्गत स्त्री रुग्णालयात प्रशिक्षणाकरिता आलेल्या एका डॉक्टर तरुणीवर वाईट नजर ठेवत तिच्याशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. याबाबत युवतीने वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर प्राथमिक चौकशी अहवाल तपासून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी १३ मे 2024 पासून डॉ. सोळंकी निलंबित केले आहे. दरम्यान या गंभीर प्रकाराची जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशाखा समितीमार्फत सखोल चौकशी केली जाणार आहे.

भूलतज्ज्ञ म्हणून नेमणुकीवर असलेले डॉ. अविनाश सोळंकी हे आपण कर्तव्यावर आहोत याचे ‘भान’च विसरले. घडलेल्या प्रकारानंतर वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आयपीएचएस अंतर्गत भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. अविनाश सोळंकी यांची ऑन कॉल बेसिस तत्वावर जिल्हा सामान्य रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये दररोज प्रसूती, सिझर होत असल्याने रुग्णांना भूल देण्याकरिता भूलतज्ज्ञाची गरज भासते. त्यासाठी ऑन कॉल डॉ. सोळंकी कर्तव्यावर असतात. एका मोठ्या शहरातील नामांकित कॉलेजमध्ये उच्च वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीची प्रशिक्षणासाठी स्त्री रुग्णालयात पंधरवड्यापूर्वीच नेमणूक झाली होती. ‘डीआरसी’ अंतर्गत तीन महिन्यांचे हे प्रशिक्षण असते. ही तरुणी ११ मे रोजी कर्तव्य बजावत असताना डॉ. अविनाश सोळंकी यांनी तिच्याशी असभ्य वर्तन केल्याची तक्रार तरुणीने रात्रीच वरिष्ठांकडे केली. त्याचवेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील तातडीने रुग्णालयात पोहोचले. त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहित घेतली दरम्यान, शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या कानावरही हा प्रकार घालण्यात आला. या प्रकारामुळे जिल्हाभरातील वैद्यकीयक्षेत्रात खळबळ उडाली.

स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांनी केलेल्या चौकशीत डॉ. सोळंकी दोषी आढळले. तसेच अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाबही घेण्यात आले, ते भूलतज्ज्ञ सोळंकींची चूक उघडकीस करणारे होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नोंदविलेल्या जबाबात प्रथमदर्शनी दोषी आढळून येत असल्याचे नमूद करतानाच चौकशी अहवालानुसार १३ मे पासून पुढील आदेशापर्यंत डॉ. सोळंकी यास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी निलंबित केले.