एकनाथराव माळेकर
चिखली
बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे पोलिस स्टेशन म्हणून अंढेरा पोलिस स्टेशनला ओळखले जाते.अंढेरा पोलिस स्टेशनची हद्द जवळपास देऊळगावराजा,चिखली आणि सिंदखेडराजा या तीन तालुक्यांत विस्तारलेली आहे. जवळपास बावन्न गावांचा कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी अंढेरा पोलिस स्टेशनची असते.तसेच जिल्हाभर नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारे पोलिस स्टेशन म्हणूनही अंढेरा पोलिस स्टेशनला ओळखले जाते.खुन,दरोडा,चोरी,महिला विनयभंग यांसारखे गंभीर स्वरूपाच्या घटना या पोलिस स्टेशन अंतर्गत नेहमीच घडलेल्या असुन ग्रामीण भागातुन सर्वात जास्त क्राईम अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत असतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अंढेरा पोलिस स्टेशनच्या ठाणेदार पदी मागिल एक ते दीड वर्षापासुन विकास पाटील हे काम पाहत असुन त्याच्यां कार्यकाळात अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जवळपास सर्वच बिट मध्ये अवैध रेती वाहतूक, खुलेआम अवैध देशी दारू,वरली मटका,आॕनलाईन चक्री,तसेच मोठमोठाले पत्ता क्लब यांनी सगळीकडे धुमाकूळ घातला असून दहा दिवसांपूर्वी जिल्ह्याला लाभलेले नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे हे सुद्धा अवैध धंदे बंद करण्यात पुर्णपणे अपयशी ठरले आहेत.
सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असुन जिल्हा पोलिस अधीक्षक हे प्रत्येक उपविभागीय कार्यालय ठिकाणी शांतता कमेटीची बैठक घेत असुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून खबरदारी घेत असुन गणेश विसर्जन असो किंवा ईद एक मिलाद असो हे सण हिंदू मुस्लिम बांधवांनी शांततेत साजरे करावे यासाठी मार्गदर्शन करत आहेत.परंतु संपूर्ण जिल्ह्याभर सुरू असलेले अवैध धंद्ये सुसाट सुरू असुन याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे हे एक शब्दही बोलायला तयार नाहीत.
याबाबत देऊळगाव राजा येथे दि.12 सप्टेंबर रोजी झालेल्या शांतता कमेटीची बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू तथा शिंदे सेना तालुकाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अनिल चित्ते यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांची भेट घेत अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत सुरु असलेले अवैध धंद्ये तात्काळ बंद करा अशा आशयाचे लेखी निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा बु,मेरा खुर्द,रोहडा, अंत्रीखेडेकर कवढळ,चंदनपुर, देऊळगाव घुबे, शेळगाव आटोळ, गांगल गाव इसरुळ,बायगांव बु,या गावात ठिकठिकाणी खुल्लेआम अवैध देशी दारू तसेच वरली मटका खेळल्या जातो.याबाबत अनेकांनी ठाणेदार विकास पाटील यांना याबाबत माहिती दिली परंतु आर्थिक लोभापायी ठाणेदार हे सुरू असलेले अवैध धंद्ये बंद करत नाही.तसेच अवैध रेती माफिया असो,अवैध देशी दारू विक्री करणारे,वरली मटका,पत्ता क्लब वाले हप्ते हे पोलिस स्टेशनला येऊन जमा करतात.त्यामुळे ठाणेदार सुरू असलेले अवैध धंद्ये कायमस्वरूपी बंद करत नाही.उलट त्यांना ठाणेदार यांचे पाठबळ असल्याने त्यांचे मनोबल वाढत आहे.त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे.
परिसरातील अवैध धंदे बंद करणे ठाणेदार यांचे आद्य कर्तव्य असताना काही ग्रामस्थांनी अवैध धंदे बंद करा अशी मागणी केली असता संबंधित ठाणेदार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांच्यावरच षडयंत्र रचत खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत.अशा भ्रष्ट ठाणेदार विकास पाटील यांना तात्काळ मुख्यालयी जमा करून त्यांची सखोल चौकशी करून परिसरात सुरू असलेले अवैध धंद्ये तात्काळ बंद न झाल्यास अनिल चित्ते यांनी आपल्या सहकाऱी सोबत दि.२३सप्टेंबर २०२४ पासुन जिल्हा पोलिस अधीक्षक किंवा पोलिस स्टेशन अंढेरा समोर अन्नत्याग अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.