Home यवतमाळ शेतकरी पुत्रांची जिल्हा प्रशासना सोबतची बैठक सकारात्मक….

शेतकरी पुत्रांची जिल्हा प्रशासना सोबतची बैठक सकारात्मक….

23

आंदोलकांच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या मागण्या रास्त,जिल्हा पातळीवर लवकरच आंबल बजावणी करू-जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया.

बहूतांश मागण्या मान्य,पण रिझल्ट मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार – प्रा.पंढरी पाठे(कृषी अभ्यासक)

यवतमाळ (प्रतिनिधी ता.२०) :- शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शेतकरी पुत्रांची जिल्हा प्रशासना सोबत मा.जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली १९ सप्टेंबर रोजी झालेली बैठक सकारात्मक झाली आहे.बहुतांश मागण्या जिल्हा प्रशासनाने मंजूर केल्या आहेत,हे आमच्या आंदोलनाचे यश आहे परंतु आम्ही पूर्णपणे समाधानी नाही,रिझल्ट मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे आंदोलक कृष्णा पुसनाके व शेतकरी नेते सचिन मनवर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा,अतिवृष्टीची १०० % नुकसान भरपाई,शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती,जंगली जनावरांपासून सरंक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आंदोलक कृष्णा पुसनाके,शेतकरी नेते सचिन मनवर व कृषी अभ्यासक प्रा.पंढरी पाठे यांनी यवतमाळ येथे आझाद मैदानात अन्नत्याग आंदोलन केले होते.या आंदोलनाची दखल घेत जिल्हा प्रशासन,यवतमाळ च्या वतीने त्यांच्यासमवेत १९ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन केले होते.महसूल विभाग,यवतमाळ येथे १९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.यावेळी कृष्णा पुसनाके यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ बैठकीत सहभागी झाले होते तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी प्रमोद लहाळे,जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे,अग्रणी बँक प्रबंधक अमर गजभिये,निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मुन,उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे,यासह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थितीत होते.तब्बल दिढ तास ही बैठक चालली.या बैठकीत प्रा.पंढरी पाठे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्या सविस्तरपणे मांडल्या.या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना प्रा.पाठे यांनी सांगितले की,सोयाबीन-कापसाची दरवाढ किती आवश्यक आहे हे आम्ही बैठकीत जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडे बाकी आहेत.या दोन्ही योजनांचे पैसे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना सरकारला कळविण्यात येतील,असा शब्द जिल्हाधिकारी यांनी दिला असल्याचे ऍड जयसिंग चव्हाण म्हणाले.शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीबाबत मात्र सरकार सकारात्मक नाही,पण बैठकीत तात्काळ घेतल्या गेलेले निर्णय कौतुकास्पद असल्याचे
प्रा.प्रवीण देशमुख म्हणाले. शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ आणि विलंब करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचेही आश्वासन या बैठकीत दिले.३० सप्टेंबरपर्यंत राज्यातले सगळ्या खरीपाचे व रब्बीचे पैसे कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील तसेच अतिवृष्टीची नुकसान भरपाई आचारसंहिता लागण्यापूर्वी देण्याचा शब्द आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सरकारच्या वतीने बैठकीत दिला.जंगली जनावरांच्या त्रासापासून मुक्तता होण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंडच्या योजनेचा प्रस्ताव मा.उपवनसंरक्षक यांच्या माध्यमातून कॅबीनेटकडे पाठवू,व श्यामाप्रसाद मुखर्जी सोलर फेन्सिंग योजनेचा लाभ जंगली परिक्षेत्रामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना कसा मिळेल यावरती अधिक फोकस करू अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चे दरम्यान सांगितली.नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्यासाठी शासनाच्या वतीने निधी उपलब्ध करुन देण्यास प्रयत्न करु,यानंतर पेरणीपूर्ण पिककर्ज उपलब्ध करून न देणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करू असाही शब्द दिला गेला.ई-पीक पाहणी दरम्यान ज्या शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या अडचणी येतात तशा ठिकाणी तलाठ्यांची मदत पुरवू अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.नाफेडने हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ज्या जाचक अटी लागू केल्यात त्यात शिथिलता आणण्यासठी वरिष्ठ पातळीवर चर्चा घडवून आणू अशी माहिती लघुनिबंधक अधिकारी यांनी दिली.बोगस बी-बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांवर,कृषी सेवा केंद्राच्या विक्रेत्यांवर फोजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा शब्द जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांनी दिला.
बैठक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक ठरली असून हे आमच्या आंदोलनाचे बहूतांशी यश आहे,असेही यावेळी ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी कृष्णा पुसनाके यांच्या शिष्टमंडळात ॲड.जयसिंग चव्हाण,प्रा.प्रवीण देशमुख,माजी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड,प्रा.निनाद सुरपाम,ऋषिकेश सराफ,प्रज्वल तुरकाने,नितीन मिर्झापुरे,तर सहकार्य म्हणून शेतकरी प्रकाश कांबळे,राहुल भानावत,अनिल चवरे,अभय अनासाने,अनिकेत हांडे,प्रशांत कुटे यांची उपस्थिती होती.

कोट….
आजच्या बैठकीत बहुतांश मागण्या मान्य झाल्याने बैठक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक ठरली.पण जोपर्यंत रिझल्ट येत नाही,जोपर्यंत मागण्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या पदरात ठोस काही पडत नाही,तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. यापुढे कोणत्या पद्धतीने आंदोलन करायचे,पुढील दिशा काय राहणार आहे हे चार ते पाच दिवसांत ठरविणार. मध्यप्रदेशमध्ये जसे आंदोलन सुरु आहे तसेच आंदोलन महाराष्ट्रातही होईल. टप्प्या टप्प्याने आणि लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार.
प्रा.पंढरी पाठे (कृषी अभ्यासक,यवतमाळ जिल्हा).