Home यवतमाळ गोधनी-जांब-बोधगव्हाण शिवारात पट्टेदार वाघाचा वावर

गोधनी-जांब-बोधगव्हाण शिवारात पट्टेदार वाघाचा वावर

13

निळोणा-बहिरम टेकडीच्या जंगली भागात वावर असल्याची माहिती : शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण


यवतमाळ – शहरापासून जवळच असलेल्या गोधनी गावापासून काही अंतरावर असलेल्या क्रशरच्या,रेल्वे रूट च्या शिवारात पट्टेदार वाघ आढळून आला. सोमवारी दि.२३ सप्टेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आलेल्या या घटनेनंतर सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सायंकाळी या वाघाने एक शिकार केल्याचीही माहिती वन विभागाला मिळाली आहे.यवतमाळ शहराच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात वन परिसर आहे. हा वन परिसर शेजारी तालुक्यातील आर्णी,घाटंजी वनपरिसराशी जोडलेला आहे.त्यामुळे या परिसरात अनेक जंगली प्राण्यांचा वावर असतो.त्यातच
घाटंजी मार्गावर असलेल्या बोधगव्हाण परिसरात रविवारी दि.२२ सप्टेंबर रोजी पट्टेदार वाघाचा वावर असल्याचे तेथील स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात आले. या परिसरातील एका शेतात गायीवर त्या वाघाने हल्लाही केला. शेतामध्ये वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. त्यानंतर सोमवारी हाच वाघ निळोणा तलावाच्या परिसरातून बरबडा आणि गोधनी शिवाराच्यामध्ये असलेल्या परिसरातून प्रवास करत सायंकाळी एका क्रशरवर पोहचला. वाघाला पाहून काही लोकांनी त्या ठिकाणावरुन पळ काढला. त्यांनी याची माहिती शेजारच्या गावामधील नागरिकांना दिली. त्यामुळे गोधणी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोट —-
वनविभागाची रेस्क्यू टीम सध्या वाघ आढळून आलेल्या परिसरामध्ये कार्यरत आहेत.नागरिकांच्या सुरक्षेच्या उपायोजना वनविभागाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.वाघाला शहरापासून दूर त्याच्या मूळ अधिवासात लवकरच सोडण्यात येईल.
धनंजय वायभासे –
उपवनसंरक्षक,यवतमाळ.