Home यवतमाळ जय विठ्ठल हरी जनतेच्या विकासासाठी वाजवा तुतारी

जय विठ्ठल हरी जनतेच्या विकासासाठी वाजवा तुतारी

22
बाजोरीयांचा वचननामा मतदारसंघात चर्चेचा विषय
यवतमाळ, – एकेकाळी शांत शहर म्हणून नावलौकिक असलेल्या यवतमाळची ओळख अलीकडे ’क्राईम सिटी’ म्हणून झालेली आहे. तर, शहरी व ग्रामीण भागातील जनता विविध समस्यांनी ग्रस्त आहे. शेतकरी, कष्टकरी संकटात आहेत. अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, त्यांची आर्त हाक ऐकायला कुणी लोकप्रतिनिधी तयार नाहीत. त्यामुळे तळागाळातील, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांचे कल्याण करण्यासाठीच शरद पवारांची ’तुतारी’ वाजविणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी (ता.1) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
याप्रसंगी पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आशीष मानकर, राहुल कानारकर, अंकित निघोट, नितीन निघोट, संकेत टोणे व पंकज मुंदे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार बाजोरीया म्हणाले की,’तुतारी शुभ काळात वाजवतात. जेव्हा अन्यायाची परिसीमा होते आणि अन्यायकर्त्यांना हाकलून लावायचे असते तेव्हा संघटित होण्यासाठी तुतारी वाजविली जाते. शरदचंद्र पवार यांनी राज्यातील अन्यायकारी सत्ताधार्‍यांना येत्या विधानसभा निवडणुकीत हाकलून लावण्यासाठीच ’तुतारी’ घेतली आहे. याच तुतारीच्या माध्यमातून यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील जनतेला आपण न्याय मिळवू देऊ!’ यवतमाळ शहरात व ग्रामीण भागात माजी आमदार बाजोरीया यांचे ठिकठिकाणी फलक लागले आहेत. त्यावर ’रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’ अशी टॅगलाइन आहे. ही टॅगलाइन लोकांच्या तोंडपाठ झाली आहे, त्यामुळे ’तुतारी’ आता लोकांना आशेचे किरण वाटू लागले आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तर शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर बोलताना आमदार बाजोरिया यांनी सांगितले की शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी केवळ आदेश देणार नाही, तर प्रशासनाला शेतकर्‍यांच्या बांधावर सोबत नेऊन शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ