Home माहिती व तंत्रज्ञान सायबर कायद्याचे महत्त्व आणि रोजगाराच्या संधी…!

सायबर कायद्याचे महत्त्व आणि रोजगाराच्या संधी…!

9

माहिती तंत्रज्ञान हे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारे क्षेत्र असून, मागील काही दशकांमध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. केवळ तंत्रज्ञान क्षेत्रातच नाही, तर सॉफ्टवेअर आणि इतर डिजिटल क्षेत्रांमध्येही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. यासोबतच, आपल्याला हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की कोणत्याही क्षेत्रात कायद्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मानवी वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्याचे नियमन करण्यासाठी कायद्याची गरज असते. ज्या क्षेत्रात मानवी हस्तक्षेप होतो त्या सर्व क्षेत्रांमध्ये कायद्याचे महत्त्व असते.

माहिती तंत्रज्ञानाचा योग्य वापर मानवजातीच्या फायद्यासाठी केला जाऊ शकतो, परंतु त्याचा गैरवापर करून गुन्हे घडवणे देखील शक्य आहे. अशा सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि शिक्षा असणे आवश्यक आहे, कारण पारंपारिक कायदे, विशेषतः भारतीय दंड संहिता, भारतीय न्याय संहिता सायबर गुन्ह्यांसाठी पुरेशी नाही. याशिवाय, माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांचे नियमन करणे देखील आवश्यक आहे, कारण हे व्यवहार फक्त आपल्या देशापुरते मर्यादित नाहीत, तर विविध देशांतील कायदे आणि नियमांनुसार होतात.
विविध अॅप्लिकेशन्स आणि माध्यमांचा वापर करून सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी देखील नियमन आवश्यक आहे. हे क्षेत्र तंत्रज्ञानात कुशल असलेल्या वकिलांसाठी एक नवे व्यावसायिक क्षेत्र बनू शकते. आयटी कंपन्या, जेव्हा नवीन अॅप्स तयार करतात किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करतात, तेव्हा त्यांना कायदेशीर सल्लागारांची गरज असते. सरकारी संस्था, एनजीओ आणि इतर संस्थांनाही सायबर कायद्यातील तज्ज्ञांची आवश्यकता आहे, कारण अनेक सरकारी प्रक्रिया आता डिजिटल माध्यमांतून पार पाडल्या जातात.

ई-कॉमर्स, ई-गव्हर्नन्स यांसारख्या क्षेत्रांनी आपले दैनंदिन जीवन व्यापले असून, त्याशिवाय जीवनाचे व्यवस्थापन करणे कठीण झाले आहे. कोरोना महामारीनंतर, डिजिटलायझेशनची गरज अधिक ठळकपणे समोर आली, ज्यामुळे आयटी आणि सायबर कायदा तज्ज्ञांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. ई-फायलिंग आणि ई-कोर्ट प्रणालीमुळे माहिती तंत्रज्ञान हे वकिलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे, ज्यामुळे या क्षेत्रात कुशलता असणे अत्यावश्यक बनले आहे.
यामुळे, माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित प्रत्येक सेवा आणि अनुप्रयोगांची तांत्रिक आणि कायदेशीर बाजू समजून घेणे हे प्रत्येक वकिलासाठी आवश्यक बनले आहे. कायद्याचे विद्यार्थी जे या क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी या संधी अमर्याद आहेत.

ॲड. वैभव गोविंद एडके,
हायकोर्ट नागपूर
vgedke@gmail.com
मो. नं. ९४०५५२५२४०