Home मराठवाडा चक्क पाहिले लग्न झालेले असतांना दुसरा लग्न करून नवरदेवा ची फसवणूक

चक्क पाहिले लग्न झालेले असतांना दुसरा लग्न करून नवरदेवा ची फसवणूक

175

गुन्हा दाखल…

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. १३ :- नवरा, दोन मुले असतांना देखील खोटे नाव व कागदपत्र तयार करत दुसर्‍या पुरुषाशी लग्न करुन त्याला सुमारे सव्वा लाखाने गंडा घालुन पसार होणार्‍या विवाहीतेसह दलाल महिला व पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तब्बल वर्षभरानंतर फसवणुक झालेल्या नवर्‍याने बायकोचा शोध घेवुन तिला क्रांतीचौक पोलिसांच्या ताब्यात दिले. सिमा उर्फ कविता अनिल रेसवाल (वय २८, रा.रोहिदासनगर, मुकुंदवाडी) असे फसवणूक करणार्‍या महिलेचे नाव असून तिला न्यायालयासमोर हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी मंगला. ए. मोटे यांनी गुरुवारी शनिवारपर्यंत (दि.१५) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
याप्रकरणी श्रीराम विरभान पाटील (वय २६, रा. जवखेडासिम ता. एरंडोल जि. जळगाव) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, श्रीरामचे वडिल वीरभान पाटील यांना जानेवारी २०१९ मधे दलाल महिला सिमा राठोडने फोन केला. व तुमच्या मुलाचे लग्न करायचे आहे का? माझ्याकडे लग्नासाठी मुलगी आहे. अशी विचारणा केली. त्यावर वीरभान पाटील यांनी होकार दिला. व मुलीचा फोटो व माहिती मागवून मुलगी पाहाण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार आरोपींनी ५ फेब्रुवारी २०१९ रोजी मुलगी पाहण्यासाठी पाटील यांना सिद्धार्थ गार्डन बोलाविले. त्यानुसार श्रीराम, त्याचे वडील, काका व इतर नातेवाईक खासगी गाडीने गार्डनला आले. तेथे लग्नाच्या बोलाचालीत पाटील कुटुंबा कडून आरोपी महिलेने १ लाख रुपये रोख घेतले. व नववधुचे नाव कविता रमेश देठे रा. इसरुळ, मंगरुळ ता. चिखली जि. बुलढाणा असे असल्याचे सांगितले व त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता सातारा परिसरातील महादेव मंदीरात लग्न लावण्यात आले. लग्नामधे नववधू च्या गळ्यात १५ हजार रुपये किंमतीचे ९ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र घातले. तसेच शंभर रुपयाच्या बॉन्डवर लग्न झाल्याचा व कविता माळीला एक लाख रुपये रोख दिल्याचे लिहुन घेतले होते.
११ फेब्रूवारी २०१९ रोजी श्रीराम नववधूला माहेरी सोडण्यासाठी औरंगाबाद मध्यवर्ती बससथानकावर आला. चिखली जाणार्‍या बसची वाट पाहत असतांना कविता अचानक कोठेतरी निघुन गेली. घाबरलेल्या श्रीरामने कविताचा शोध घेतला व दलाल सिमाला देखील वेळोवेळी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही. त्यानंतर श्रीरामने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर देखील श्रीराम हा पत्नीचा शोध घेत होता. त्यावेळी दलाल महिला सिमा राठोड अशा प्रकारे लग्न लावुन लोकांना गंडा घालत असल्याची तसेच कविताचे देखील लग्न झालेले असुन तिला दोन मुले असल्याची माहिती श्रीरामला मिळाली. या प्रकरणात आरोपी पत्नी कवीता रमेश देठे उर्फ सिमा अनिल रेसवाल, दलाल सिमा रवि राठोड उर्फ सविता किसन माळी आणि अमोल रमेश देठे या तिघांविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.