विनोद पत्रे
पुणे , दि. १५ :- हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची बदनामी करणारे व्हिडिओ युट्यूबसह इतर सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांविरोधात पुणे सायबर शाखेकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदुरीकर यांचे वकील पांडुरंग शिवलीकर यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
समतिथीला मुलगा व विषम तिथीला मुलगी जन्माला येते असं कथित विधान करणारा निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. त्यामुळे इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्यावर चोहेबाजुने टीका होत होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षाही तैनात करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पुणे सायबर पोलिसांत अॅड. पांडुरंग शिवलीकर यांनी शरद शिंदे, मराठी तडकाशी संबंधित अज्ञात व्यक्ती, मराठी मीडिया, चिवडे, अमर आवटे आणि माझा महाराष्ट्राशी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदुरीकरांचे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करून त्यांची बदनामी केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. भादंविच्या कलम ५०० अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, इंदुरीकर महाराज हे त्यांच्या कीर्तनातून सतत महिलांविरोधात बोलत असतात. महिलांची बदनामी करत असतात, त्यामुळे त्यांच्या विरोधातच गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक संस्थांकडून होत आहे. तसेच शिक्षकांविरोधात केलेल्या टिप्पणीची त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळं शिक्षक संघटना त्यांच्यावर नाराज झाल्या आहेत. त्यामुळेही इंदुरीकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवाय इंदुरीकरांनीही कीर्तन सोडून शेती करण्याचे सुतोवाच केले आहे.