अब्दुल कय्युम
औरंगाबाद शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज १५२.२४ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे ही माहिती दिली. औरंगाबाद महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे (एमआयडीसी) ही कामे केली जाणार आहेत.
औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी महापालिकेने २६३ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सुभाष देसाई व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेनंतर १५२.२४ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली.
औरंगाबाद शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत व सर्व कामे एकाचवेळी सुरू करून कमीत कमी कालावधीत पूर्ण व्हावीत म्हणून औरंगाबाद महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ व महाराष्ट् औद्योगिक विकास महामंडळ या तिन्ही यंत्रणांनी समान कामे देण्यात आली आहेत. तिन्ही यंत्रणांनी प्रत्येकी ५० कोटींची कामे पूर्ण करावीत तसेच एकूण १५२.२४ कोटी रकमेची नगर विकास विभागाच्या शहरी रस्ते विकास निधीतून प्रतिपूर्ती केली जाईल असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
या बैठकीसाठी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे, एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.
या निर्णयामुळे औरंगाबादकरांना आता दर्जेदार रस्ते विलंबाविना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.