विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगावच्या अमृतमहोत्सवी सोहळा संपन्न
अमीन शाह
खामगाव – विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गो से महाविद्यालयाच्या वतीने मंडळाचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उद्घाटक म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संचालक डॉ .धनराज माने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव बोबडे, उपाध्यक्ष माननीय श्री. अशोकजी झुनझुनवाला, व्यासपिठावर महाराष्ट्र राज्यचे प्रौढ व निरंतर शिक्षण संचालक श्री सुनील चव्हाण व अमृतमहोत्सवी कार्यक्रम समितीचे अध्यक्ष अजिंक्य दादा बोबडे, प्राचार्य डॉ. डी. एस. तळवळकर, उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रास्ताविक करताना म्हणाले की, पश्चिम विदर्भात शिक्षणाची सुरुवात करणारे ध्येय निष्ठ समाजसेवी स्वर्गीय आद्यप्रवर्तक एडवोकेट सोमकांत भाटे, रावबहादुर आटले, असे समाज कर्त्यांनी प्रबोधन करून, दूरदृष्टी आणि त्याग करुन या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी अतुलनीय योगदान केले. त्यांनी पुढाकार घेतला म्हणून त्यांचेॠण विसरता येणार नही. ध्येय निष्ठ समाजसेवी स्वर्गीय शंकरराव बोबडे यांनी समाजातील गोरगरीब घटकांना शिक्षण मिळावे यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे उल्लेखनीय कार्य शब्दातीत आहेत, ‘सेवा आणि समर्पित जीवनच चांगले कार्य करू शकते’.
75 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडाचा आढावा घेताना प्राचार्य म्हणाले की ज्ञान आणि सेवा यांचा संगम जिथे घडतो तिथे समाजाला योग्य दिशा मिळते. ती दिशा देण्याचे काम बोबडे परिवाराने केले आहे. याप्रसंगी उद्घाटनपर भाषणात उपस्थितांना संबोधित करताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संचालक डॉ. धनराज माने म्हणाले की, काळाची पाऊले ओळखून समाजकार्याची धडपड करणारे अनेक ज्ञानतपस्वी या समाजात जन्म घेतात त्यांच्या अखंड, अथक परिश्रमातून समाजाला दृष्टी लाभते. समाजाच्या त्या विश्वासास संस्थेने पात्र ठरावे, ही पात्रता या मंडळाने मिळवली आहे. त्यांचे समाजोपयोगी कार्य पाहता गो से महाविद्यालयाच्या रूपाने ज्ञान वृक्षाचा हा वटवृक्ष वाढतच राहणार यात शंका नाही. विचार आणि शुद्ध भावना असल्या की, ज्ञानाचा अखंड दीप तेवत ठेवता येतो. हेच कार्य या संस्थेने अखंड चालविले आहे, याचा आम्हास अभिमान वाटतो. विदर्भासारख्या मागास भागात शिक्षणाचे मोठे दालन उघडे करून समाजाला शिक्षित करण्याचे महत्त्वाचे कार्य गो से महाविद्यालय करित आहे. त्यांची वाढ आणि विकास पहाता अनेक गुणवंत विद्यार्थी समाजाला दिले आहेत. या समाज ऋणाची 75 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण करून आज ही संस्था लोक गौरवास्पद ठरली आहे. असेच कार्य अनेक संस्थांनी करून समाजाभिमुख कामाला गती द्यावी, यातच देशाचे व समाजाचे हित आहे .याप्रसंगी जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले राज्याचे अल्पसंख्यांक शिक्षण, संचालक श्री सुनिल चव्हाण म्हणाले की ज्ञानृरूपी सेवा घडत असताना अनेक संस्काराची मूल्य जोपासण्याची बुद्धी शिक्षणातून प्राप्त होते. आईवडिलांची सेवा, देशाची सेवा ,समाजाची सेवा केल्यास याच जन्मास माणसाला सद्गती प्राप्त होते. हा मूल्य संस्कार देणारे केंद्र म्हणजे महाविद्यालय आहे. कठोर मेहनत व अटळ निष्ठा याचा सुयोग्य संगम जीवनात घडविल्यास कोणताही विद्यार्थी उच्च पदावर पोहोचू शकतो व समाज कार्याला गती देऊ शकतो .कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष डॉ. दादासाहेब बोबडे म्हणाले की, हा शिक्षण रथ समाजासाठी गतिमान आहे. त्यामध्ये हे प्राध्यापक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांचे सुयोग्य योगदान आहे. म्हणूनच महाविद्यालयाने अ दर्जा प्राप्त केला. पुढील काळातही महाविद्यालयास ‘A’ प्लस प्लस दर्जा मिळेल याची खात्री मला आहे. अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष अजिंक्य दादा बोबडे आभार प्रदर्शन करताना म्हणाले की, ही समाजसेवेची अभिलाषा घेऊन ज्ञानाचा दीप अखंड तेवत राहावा म्हणून त्याग आणि समर्पण करण्याची आम्हा परिवाराची रीत आहे. पुढेही समाजाच्या उपयोगी जे जे काही करता येईल ते निश्चितच करण्यात आम्ही पुढाकार घेऊ असे म्हणून त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. प्रशांत बोबडे, संचालक मंडळाचे विविध पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या गुणाचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले. महाविद्यालयाची परंपरा अशीच कायम राहावी ह्याने प्रेरित होऊन दर्जेदार शिक्षणासाठी हे महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत काम करते, त्याची पावती आज मिळाली, असे आम्हाला वाटते. कोणत्याही संस्थेच्या प्रगतीमध्ये ध्येयवेड्या अढळ निष्ठा असणाऱ्या सेवा वृत्तींची दूरदृष्टी परिणामकारक असावी लागते, तीच दृष्टी या संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय शंकरराव बोबडे यांची होती. म्हणूनच या संस्थेने 75 वर्ष यशस्वीरित्या वाटचाल केली आहे. ही संस्था लोक गौरवास निश्चितच पात्र आहे. असे राज्याचे संचालक डॉ.धनराज माने म्हणाले. यावेळी 75 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडाचा आढावा असलेली स्मरणिके चे विमोचन माननीय डॉ .धनराज माने व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मेरीट च्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. काही उत्कृष्ट विद्यार्थ्यांचे कौतुक करून विविध स्वरूपाचे बक्षीसही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ. संगीता वायचाळ यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील, परिसरातील लोकांची व विद्यार्थ्यां ची मोठी गर्दी उपस्थित होती, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक, श्री. अजिंक्य दादा बोबडे, डॉ. प्रशांत बोबडे, श्री रोषण झांबडजी, एडवोकेट अनिल व्यास, डॉ. सुरेंद्र जैन, तसेच विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी बांधव, सर्व विद्यार्थी, यांनी कष्ट घेतले. असे, प्रसिद्धी प्राध्यापक व्हि. यु मोरे यांनी कळविले आहे,.