रावेर (शरीफ शेख)
जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे मंगळवार दि.२४ फेब्रुवारी रोजी “छायाचित्र पत्रकारिता” या विषयांवर कार्यशाळा आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांच्या हस्ते कॅमेरा क्लीक करुन करण्यात आले. जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर अधिसभा सदस्य तथा ज्येष्ठ छायाचित्रकार शब्बीर सैयद, पांडूरंग महाले, संधीपाल वानखेडे, प्रा. विनोद निताळे, डॉ.गोपी सोरडे उपस्थित होते. कुलसचिव प्रा. बी.व्ही.पवार यांनी उद्घाटनपर भाषणात सांगीतले की, छायाचित्रांना दैनिकात खुप महत्वाचे स्थान आहे. एक छायाचित्र एक हजार शब्दांचे काम करते त्यामुळे बातमी सोबत छायाचित्र छापून येणे आवश्यक असते. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांचा छायाचित्रकारांशी संवाद होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचा फायदा होईल. शब्बीर सैयद यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, कार्यशाळेच्या निमित्ताने दैनिकांच्या छायाचित्रकांराचा सन्मान करण्यात आला. हा आनंदाचा क्षण आहे. छायाचित्रकार नेहमी उपेक्षित राहतो. छायाचित्रकारांना छायाचित्र मिळविण्यासाठी खुप कष्ट करावे लागतात. अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.सुधीर भटकर यांनी सांगितले की, छायाचित्रा शिवाय कोणतेही वृत्तपत्र पुरिपूर्ण होऊ शकत नाही. वृत्तपत्रात छायाचित्रांना अनन्य साधारण महत्व आहे. वृत्तपत्रातील छायाचित्रकार नेहमी उपेक्षित राहीला आहे. म्हणून कार्यशाळेचे औचित्य साधुन आज छायाचित्रकारांचा सत्कार आयोजित केला. प्रारंभी लोकमतचे सचिन पाटील, दिव्यमराठीचे आबा मकासरे, देशदूतचे योगेश चौधरी, जनशक्तीचे निखील सोनार, सकाळचे दीपक पाटील, पुण्यनगरीचे नितीन सोनवणे, सामनाचे उमेश चौधरी, लाईव्ह ट्रेनचे वशिम खान, माहिती कार्यालयातील सुरेश सानप व कबचौउमविचे शैलेश पाटील आदी छायाचित्रकारांचा स्मृतीचिन्ह व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.
दुपारच्या सत्रात ज्येष्ठ छायाचित्रकार पांडूरंग महाले यांनी “छायाचित्र पत्रकारितेतील स्थित्यांतरे” तर संधीपाल वानखेडे यांनी “छायाचित्र पत्रकारिता स्वरूप आणि तंत्र” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.विनोद निताळे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.गोपी सोरडे यांनी केले. मयुर पाटील याने आभार मानले.