Home मराठवाडा महाराष्ट्रातील लेकींना भाजपच्या लोकांपासून धोका आहे –  रुपाली चाकणकर

महाराष्ट्रातील लेकींना भाजपच्या लोकांपासून धोका आहे –  रुपाली चाकणकर

130

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. ०१ :- ‘महिला सुरक्षेवरुन राज्य सरकारवर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे गृहमंत्रीपद असताना महिला संरक्षणासाठी कोणता कायदा आणला? महिलांविषयी अपशब्द वापरणाऱ्या भाजप नेत्यांना फडणवीस यांनी अगोदर सुधारावे. महाराष्ट्रातील लेकींना भाजपच्या लोकांपासून धोका आहे. अन्यथा, महाराष्ट्र आपोआप सुरक्षित होईल’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाकणकर शनिवारी जिल्हा दौऱ्यावर होत्या. राष्ट्रवादी भवनात त्यांनी इच्छुक महिला उमेदवारांशी चर्चा केली. तसेच मेळाव्यात आगामी राजकीय आणि सामाजिक उपक्रमांवर मार्गदर्शन केले. यावेळी माजी मंत्री फौजिया खान, महिला शहराध्यक्ष मेहराज पटेल, छाया जंगले, प्रतिभा वैद्य, वीणा खरे, वंदना चौधरी, अश्विनी बांगर, मंजूषा पवार उपस्थित होत्या. या मेळाव्यानंतर चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. ‘राज्यात महिला अत्याचार वाढले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘दिशा’ कायदा राबवून कारवाई करण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तालुकानिहाय महिला दक्षता समिती स्थापन करणार आहे. समिती पीडितांना पाठबळ देणार आहे. महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून लवकरच योजना जाहीर होणार आहेत. बचतगट चळवळीच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यात येणार आहे. हिंगणघाट येथील घटनेनंतर महिला अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अत्याचाराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीका करीत आहेत. फडणवीस यांच्याकडे गृहखाते असताना पाच वर्षांत किती महिलांवर अत्याचार झाले त्याची आकडेवारी उपलब्ध आहे. गंभीर घटना घडल्यानंतर त्यांनी काय कारवाई केली ? असा सवाल चाकणकर यांनी केला. महिलांबद्दल बेताल वक्तव्ये करणाऱ्या भाजप नेत्यांवर चाकणकर यांनी टीका केली. महिलांबद्दल राम कदम, गिरीश महाजन, गिरीश बापट यांनी अपशब्द वापरले. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार आहेत. या नेत्यांना फडणवीस यांनी सुधारावे. महाराष्ट्रातील लेकींना सर्वाधिक भीती भाजपच्या लोकांपासून आहे. महाराष्ट्र आपोआप सुरक्षित होईल’, असे चाकणकर म्हणाल्या. ‘औरंगाबाद महापालिका निवडणुकीचा आढावा घेतला आहे. महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. आमच्या जागा निश्चित वाढतील’, असा विश्वास चाकणकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या मेळाव्यात जयभवानीनगर येथील अर्चना गवळी यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यात शकुंतला गवळी, मंदा गायके, उषा पालवे, शिवकन्या गवळी, सिंधू गवळी, मंगल जायभाय, सविता खोसे, रुख्मिण खोसे, पूजा शिंदे, विद्या काकडे यांचा समावेश आहे. याशिवाय जया राजकुंडल, बेबीताई वेताळ, मीना सावळे यांनीही पक्षप्रवेश केला.

हा तर महिलांचा सन्मान….!

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेतील रिक्त जागेसाठी माजी मंत्री फौजिया खान यांना उमेदवारी दिली. या निर्णयाबद्दल खान यांनी समाधान व्यक्त केले.