नांदेड , दि.६ ; ( राजेश भांगे ) –
राज्यातील गृहरक्षक दलात काम करणारे कर्मचारी म्हणजे होमगार्ड यांचा कर्तव्यभत्ता ३०० वरून आता ५७० रुपये प्रतिदिन करण्यात आला आहे. तसेच होमगार्ड या पदासाठी वर्षातून किमान ५० टक्के रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे आहे, असे उत्तर गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिले.
शिवाय होमगार्डची वयोमर्यादा ५५ वरून ५८ वर्षे करण्यात आली आहे. सोबत कामावरून कमी केलेल्या होमगार्डना माफीनामा घेऊन संघटनेत पुन्हा कामावर घेणार. होमगार्डला गणवेश किट भत्त्यासाठी रकमेत २५०० रुपये वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती ना. अनिल देशमुख यांनी सभागृहाला दिली.