Home पश्चिम महाराष्ट्र “चला हवा येऊ द्या” टीव्ही शो मधील शाहू महाराज व सयाजीराजे यांच्या...

“चला हवा येऊ द्या” टीव्ही शो मधील शाहू महाराज व सयाजीराजे यांच्या अवमाना बद्दल दोषींनी प्रेक्षकांची माफी मागावी- शंभुसेना संघटना

240
पुणे , दि. १४ – (प्रतिनिधि) – “चला हवा येऊ द्या” टीव्ही शोच्या मंचावर बुधवार दि.11 मार्च 2020 रोजी झालेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज तसेच महाराज सयाजीराजे गायकवाड यांच्या मुळ प्रतिमेला फोटोशॉप करून कलाकारांचे फ़ोटो जोडून आदर्श युगपुरुषांची विटंबना केल्याने शिव-शंभु- शाहूराजेंसह सयाजीराजे प्रेमींनी व नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाने तात्काळ संबंधित टीव्ही शोमधील दोषींवर कायदेशीर कारवाई करावी तसेच जबाबदार व्यक्तींनी जाहिर माफीही मागावी अशी मागणी ऐतिहासिक शिर्के घराण्याचे वंशज व शंभुसेना संघटनेचे प्रमुख मा.दिपकराजे शिर्के यांनी केली आहे.

झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा विनोदी कार्यक्रम घराघरात पोहोचला असून कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेते डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे ही नावे आता प्रत्येकाच्या परिचयाची झाली आहेत. त्यामुळे, या कार्यक्रमातील प्रत्येक एपिसोडला आवर्जुन पाहिलं जात आहे. या कार्यक्रमातून मराठी आणि हिंदी चित्रपटांचे प्रमोशनही करण्यात येते त्यानुसार नुकतेच सुबोध भावे आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्या उपस्थितीत ‘विजेता’ चित्रपटासंदर्भात केलेल्या खास शोमुळे “चला हवा होऊ द्या टीम” अडचणीत येण्याची शक्यता आहे.

”चला हवा येऊ द्या सारख्या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराजा सयाजीराव गायकवाड तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची विटंबना करण्यात आलेली आहे. आपल्या अतिशय खालावलेल्या विनोदातुन ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या विकासासाठी, सामाजिक सुधारणांसाठी आपले आयुष्य वेचले अशा महापुरुषांची विटंबना करणे ही दुर्देवी बाब आहे. झी मराठी वाहिनी आणि दिग्दर्शक डॉ.निलेश साबळे यांचाही शंभुसेना संघटनेने अत्यंत कडक शब्दात जाहीर निषेध करत, संताप व्यक्त केला आहे तसेच सध्या नेटकऱ्यांनीही टीव्ही शोवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केल्याने आता सामान्य लोकांच्या भावनेचाही विचार केला जावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबईची आम भाषा हिंदी असल्याचं “तारक मेहता का उल्टा चष्मा” या मालिकेत म्हटले होते. त्यावर, आक्षेप घेत मनसेनं व शंभुसेनेने संबंधित निर्माता आणि कलाकारांना जाब विचारला होता. त्यानंतर, संबंधित निर्मात आणि कलाकारांनी व्हिडीओच्या माध्यमातून जाहिर माफी मागितली होती.आता महाराजा सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या मुळ तसबीरीला फोटोशॉप करून आपले चेहरे चिकटवणारे कुशल बद्रिके आणि भाऊ कदम या कलाकारांचा जाहीर निषेध शंभुसेना संघटनेने केला आहे.