नांदेड, दि. ३० ( राजेश भांगे )- कोरोनाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यासह इतर राज्यातील एकही व्यक्ती, मजूर, हमाल, रोजंदारी कर्मचारी उपाशी राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
कोरोनाच्या परिस्थितीला मुकाबला करण्यासाठी चालू असलेल्या स्थितीचा आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेतला त्यावेळी त्यांनी सुचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आदी या वेळी उपस्थित होते.
आशा परिस्थितीमध्ये परराज्यातील कामगार व जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याबाबत महत्वाच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष सतर्क ठेवून संपर्क करणाऱ्यांची तात्काळ दखल घेण्यात यावी. त्यांना वेळेत मदत करावी. जिल्ह्यात कुठेही रक्तदान करता येईल यासाठी तालुकास्तरावर रक्तदान करता येईल असा प्रयत्न करावा. जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी चालू असलेल्या मदत केंद्रातील सोयी बाबत महत्वाच्या सूचनाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिल्या.