कर्जत – जयेश जाधव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंटस आणि पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. मात्र कर्जत तालुक्यातील गौरकामथ ग्रामपंचायत हद्दीतील एका फार्महाउसमध्ये अद्याप मुंबईहून येणाऱ्या पाहूण्यांची वर्दळ दिसून येते आहे.
चौकशीस गेलेल्या महिला ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंचानाही अपमानजनक वागणूक मिळत असल्याने या अरेरावीने ग्रामस्थांमध्ये संताप आणि कोरोना पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
या रेड हाऊस फार्म हाऊसमध्ये काही परगावचे पाहूणे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांची, आरोग्य सुरक्षेच्या आणि संचारबंदीच्या कारणाने ग्रामपंचयतीच्यावतीने चौकशी करण्यासाठी ग्रामपंचयतीच्यावतीने ग्रामसेवक, पोलिस पाटील, गौरकामथ्चे सरपंच योगेश भाऊ देशमुख आणि अॅड.योगेश देशमुख, पंकज जाधव व ग्रामस्थ केले होते. विचारणा करण्यास गेलेल्या ग्रामस्थांना, तुम्ही गावचे खेडूत लोक आमच्यासारख्या शिक्षितांना काय शिकवता, तुम्ही आमच्याकडे विचारणा करु शकत नाही, तुम्हांला काय करायचे ते करा, आमच्या फार्म हाउसमध्ये युनिव्हर्सल बिझनेस स्कूलचे संचालक त्यांच्या कुटूंबियांसमवेत जेवणासाठी आलेल्या आहेत, अशा अरेरावीच्या शब्दांत ग्रामसेवक आणि सरपंचांसह इतर मंडळींना दुरुत्तरे करण्यात आली आहेत. संबधितांची माहिती देण्यासही टाळाटाळ केली जात आहे. विशेष म्हणजे फार्म हाऊसचे केअर टेकर कार्तिक रामास्वामी हे कर्जत परिसरात चालवण्यात येणाऱ्या युनिव्हर्सल बिझनेस स्कूलचे प्राध्यापक आहेत, अशी माहिती समोर येते आहे.
या फार्म हाउसबाबत साशंकता निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी याविषयी अधिक माहिती जाणून घेतली असता, गौरकामथ ग्रामपंचायतीच्या हद्दीत केतकी बन येथे रेड हाउस नावाचे एक फार्म हाऊस व्यावसायिक पर्यटन स्थळ असल्याचे समोर आले आहे. मुख्य रस्त्यापासून आतल्या बाजूला, गावापासून आत असणार्या फार्महाउसमध्ये वर्षभर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध आफॅर्स देण्यात येतात, याबाबतची माहिती आॅनलाईन फेसबुकच्या पेजवरुन लक्षात आली. हे फार्म हाउस नेमके कोणाच्या मालकीचे आहे याबाबत संदिग्धता आहे. या फार्म हाऊसमध्ये पर्यटनाशी संबंधित बेकायदेशीरपणे लॉजिक, हॉटेलिंगचा व्यवसाय चालवला जातो. त्यानुसार फेसबुक, आॅनलाईन वेबसाईटवर जाहिराती दिल्या जातात आणि बुकिंग स्विकारले जाते. मात्र गौरकामथ ग्रामंपंचायतीकडे याबाबतची कोणतीही नोंद नसल्याचे आढळून आल्याने गावात एकच चर्चा सुरु झाली आहे. याबाबत यापूर्वी काहींनी तिथे चालणार्या समारंभाबाबत विचारण केल्यास, फॅमिली फ्रेड आहेत, फॅमिली सेलिब्रेशन आहे, अशी कारणे देत वेळ मारुन नेली जात असल्याची माहितीही पुढे येत आहे.
सध्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाबाबत शहरांपेक्षा ग्रामीण भागात कमालीची काळजी घेतली जात आहे, गावात बाहेरुन आलेला व्यक्ती कोण, कुठून आला आहे, त्याच्या प्रवासाची इतर माहिती याबाबत कसून चौकशी केली जात आहे. आणि याचे कौतुक खुद्द पंतप्रधान मोदींनी केले आहे. गावकरी सतर्क राहिले आहेत, म्हणूनच कोरोना गावापासून अद्याप तरी दूरच राहिला आहे. मात्र अशा उच्चशिक्षितानी जर नियमांचे उल्लंघन केले तर त्याची शिक्षा संपूर्ण गावाला का असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
अशा मनमानी लागणा-यावर प्रशासनाने संसर्ग जन्य रोग नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करावी आणि जे परगावाहून आलेले लोक आहेत, ते नेमके किती दिवसांपासून फार्म हाउसमध्ये मुक्कामास आहेत, जर संचारबंदीनंतर त्यांचा प्रवास झाला असेल तर त्यांना प्रवासाचा परवाना कोणी दिला? याची चौकशी करावी, तसेच त्या संबधित फार्महाउसमध्ये नेमके किती लोक वास्तव्यास आहेत? याचीही तातडीने चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
कर्जत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीत बहूपर्यायी सेवा देणाऱ्या फार्म हाउस व्यवसायाचा बोलबाला आहे. कर्जत, माथेरान लोणावळा आणि खंडाळा या मुख्य शहरालगतच्या परीसरात उत्तम आणि अत्याधुनिक सेवा सुविधा देणाऱ्या फार्म हाउसची ख्याती आहे. अपवाद वगळता यापैकी सर्वच फार्महाउसनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्व सेवा बंद केल्या आहेत. राज्य सरकारच्या संचारबंदी आणि लॉकडाउन आदेशाचे इतर सर्व फार्म हाउस पालन करीत असताना गौर कामथ ग्रामपंचायत हद्दीतील फार्महाउसप्रमाणे कर्जतमधील इतरही काही फार्महाउसमध्ये असे पाहूणे आले आहेत का?? याची तपासणीही कर्जत पोलिसांसह प्रशासनाने करावी, अशी मागणी होते आहे.
चौकट : वाधवान बंधू प्रकरण……
वाधवान बंधूंनी गैरमार्गाने वरीष्ठांकडून खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास पार केला, त्याच प्रमाणे आणखी काही ‘वाधवान’ कर्जतमधील कोण कोणत्या फार्म हाउसमध्ये विनापरवाना वा मागच्या दाराने गैरपरवाना घेत वास्तव्यास आले आहेत काय? आणि त्यांच्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होत नाही ना याची काळजी प्रशासनाने तातडीने घेण्याची मागणी होते आहे.
कोट:
“गौरकामथ ग्रामपंचायत हद्दीत रेड हाऊस फाॅमहाऊसच्या घरपट्टीची नोंद असून परंतु तेथे चालणार्या व्यवसायाच्या संदर्भात ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतलेली नाही व दिलेली नाही बाहेरील आलेल्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ग्रामपंचायतीमध्ये ठेवली जात आहे.मात्र रेड हाऊस फाॅमहाऊसला याआधीसुध्दा बाहेरील , परगावी व्यक्तीची माहिती देण्यासंदर्भात नोटीस बजावली होती परंतु या नोटीसीचे उल्लंघन केले आहे.याबाबत कर्जत पंचायत समिती,कर्जत पोलिस ठाण्यात कळविण्यात आले आहे तरी प्रशासनाने योग्य पावले उचलावीत जेणेकरून रेड फाॅमहाऊसच्या अरेरावी व मनमानी कारभाराला चाप बसेल.”
. योगेश भाऊ देशमुख
(सरपंच ,ग्रामपंचायत गौरकामथ)
” गौरकामथ ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत रेड हाऊस फाॅमहाऊस मधील आलेल्या बाहेरील परगावी आलेल्या लोकांची चौकशी करून त्याची वैद्यकीय तपासणी करून योग्य ती माहिती घेऊन त्यानंतर पुढील तपास करून कार्यवाही करण्यात येईल”
अनिल घेरडीकर (उपविभागीय पोलिस अधिकारी ,कर्जत )
“गौरकामत ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रेड हाऊस नामक फार्महाऊस वर परगावा वरून लोक आले असल्याचे निदर्शनास आले असून ,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची चौकशी होणे जरुरीचे आहे मात्र ग्रामपंचायतिच्या नोटीसीला जुमानत नसल्याने या संदर्भात मी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मेल द्वारे तक्रार दाखल केली आहे.”
अॅड योगेश काशिनाथ देशमुख (ग्रामस्थ गौरकामत)